मुख्यमंत्री बोम्माई यांच्या हस्ते उत्सवाचे उद्घाटन
प्रतिनिधी /बेळगाव
वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांनी इंग्रजांविरुद्ध दिलेला लढा अविस्मरणीय आहे. कित्तूर चन्नम्मा आणि संगोळ्ळी रायण्णा यांचे बलिदान कधीच विसरता येणार नाही, असे उद्गार मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी काढले.
वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांच्या उत्सवाला रविवार दि. 23 पासून सुरुवात झाली. जिल्हा प्रशासन व कन्नड व सांस्कृतिक विभाग आणि पर्यटन विभाग यांच्यावतीने उत्सवाला चालना देण्यात आली. सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांना चालना देण्यात आली.
कित्तूर व परिसराच्या विकासासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. पाटबंधारे प्रकल्पासाठी 580 कोटी रु., जलजीवन मिशनअंतर्गत कित्तूर, खानापूर, बैलहोंगल मतदारसंघांसाठी 960 कोटींचे अनुदान दिले आहे. कित्तूर चन्नम्मा यांचा वाडा बांधण्यासाठी 115 कोटीचे अनुदान मंजूर केले आहे. कित्तूरजवळ राजवाडय़ाची प्रतिकृती निर्माण करण्यात येणार आहे. किल्ल्याच्या नूतनीकरणासाठी 27 कोटी रु.चे अनुदान मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले. कित्तूरजवळ औद्योगिक वसाहत बांधण्यासाठी 1 हजार एकर जमीन घेण्यात आली असून त्या ठिकाणी युद्धपातळीवर काम सुरू आहे. 50 हजार तरुणांना त्या माध्यमातून रोजगार देणार आहे. धारवाड-हुबळी रेल्वेमार्ग कित्तूरमार्गे जाणार आहे. त्यासाठी भू-संपादन प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सुवर्णसौधसमोर कित्तूर चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ांची उभारणी करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री गोविंद कारजोळ, मध्यम उद्योग मंत्री मुरुगेश निराणी, धर्मादाय खाते मंत्री शशिकला जोल्ले, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, आमदार दुर्योधन ऐहोळे, काडा अध्यक्ष विश्वनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
रविवारी वीरराणी कित्तूर चन्नम्मा सर्कल-कित्तूर येथे सकाळी ज्योतीचे स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी नितेश पाटील, खासदार इराण्णा कडाडी, आमदार महांतेश दोड्डगौडर, आमदार महांतेश कौजलगी, राजयोगेंद्र स्वामी, पंचाक्षरी महास्वामी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कित्तूर येथील एपीएमसी प्रांगणात प्रदर्शनाचे व क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन झाले. डॉग शोमध्ये विविध जातींच्या कुत्र्यांचा सहभाग लक्षवेधी ठरला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माहिती व प्रसारण खात्याचे गुरुनाथ कडबूर, कन्नड व सांस्कृतिक विभागाच्या साहाय्यक संचालिका विद्यावती बजंत्री आदींनी विशेष परिश्रम घेतले.









