वृत्तसंस्था / कौलालंपूर
येथे सुरू असलेल्या विश्व स्क्वॅश चॅम्पियनशिप आशिया पात्र फेरीच्या स्पर्धेत भारताचा स्क्वॅशपटू वीर चोटरानीने कौलालंपूरच्या मोहम्मद सीयाफिक कमालचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. त्याच प्रमाणे भारताच्या अनहात सिंगने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
शुक्रवारी झालेल्या पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत द्वितीय मानांकीत चोटरानीने सहाव्या मानांकीत मोहम्मद कमालचा 9-11, 11-6, 11-6, 11-7 अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. मात्र या स्पर्धेत महिलांच्या विभागात भारताच्या तन्वी खन्नाचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले. हाँगकाँगच्या हेलन टेंगने तन्वीचा 11-6, 11-6, 10-12, 11-9 अशा सेट्समध्ये पराभव केला. तन्वी खन्नाने या स्पर्धेत यापूर्वीच्या सामन्यात हाँगकाँगच्या टॉप सिडेड चेंगला पराभवाचा धक्का दिला होता. यास्पर्धेतील पुरुष आणि महिला गटातील विजेते शिकागोमध्ये 9 ते 17 मे दरम्यान होणाऱ्या विश्व़ स्क्वॅश स्पर्धेसाठी पात्र ठरतील.
महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या पाचव्या मानांकित 17 वर्षीय अनहात सिंगने जपानच्या अकेरी मिडोरीकेव्हाचा 11-1, 11-7, 11-5 अशा सेट्समध्ये फडशा पाडत उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता अनहात सिंग आणि हाँगकाँगची हेलन टेंग यांच्यात उपांत्य फेरीची लढत शनिवारी होत आहे.









