पंचायत, कोमुनिदाद, ग्रामस्थ बनले आक्रमक : वेदांतचा अनेक गोष्टींबाबत बेकायदेशीरपणा
डिचोली : पिळगाव सारमानस येथील ग्रामस्थांनी काल सोमवारी सकाळी वेदांत कंपनीची खनिज वाहतूक रोखून धरली. पंचायत व कोमुनिदाद यांना न विचारता कंपनीतर्फे विविध बेकायदा कामे सुरू असल्याने त्याला पंचायत तसेच कोमुनिदादने हरकत घेत खनिज वाहतूक रोखली. त्यामुळे बराच वेळ कंपनीचे अधिकारी व ग्रामस्थ यांच्यात चर्चा सुरू होती. सरपंच शर्मिला वालावलकर, पंचसदस्य मोहिनी जल्मी इतर सदस्य, ग्रामस्थ तसेच अॅड. अजय प्रभुगावकर आदींनी सोमवारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत वाहतूक रोखली. या ठिकाणी रस्त्यावर चिखलमाती असून रस्ते निसरडे झाले आहेत.
त्यामुळे विद्यार्थी, ग्रामस्थ वाहनचालक यांना त्रास होत असल्याने वाहतूक बंद ठेवण्यात यावी, असे सरपंच शर्मिला वालावलकर यांनी सांगितले. कंपनीने परवानगी न घेताच एका रात्रीत या ठिकाणी वजन काटा बसवला असून त्याला आमचा विरोध आहे, अशी माहिती अॅड. अजय प्रभुगावकर यांनी दिली. वेदांत कंपनीतर्फे गाड्यांचे टायर धुतले जातात ते पाणी कालव्यामधून सोडण्यात आल्याने ते थेट शेतात जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बेकायदा गोष्टी होऊ देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. दरम्यान या संदर्भात कंपनीचे अधिकारी आपल्या परीने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत होते. कंपनीने मात्र अधिकृत आपली भूमिका स्पष्ट केली नाही.
कंपनीचे काम सर्व नियमांनुसारच
पिळगाव येथे वेदांत कंपनीतर्फे खाण कामकाजात सरकारतर्फे लागू असलेल्या सर्व पर्यावरणीय, सुरक्षितता व नियामक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. कंपनी प्रशासनाकडून लोकांशी संवाद व सहकार्याची भावना ठेऊन नागरी प्रशासनासह सर्वांशी चांगले संबंध ठेऊनच काम केले जात आहे, असे स्पष्टीकरण वेदांत खाण कंपनीतर्फे करण्यात आले आहे.









