भारताला फायदा होणार असल्याचे संकेत : चार वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर कंपनीने मिटवला वाद
नवी दिल्ली :
भारतीय उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या वेदांत रिसोर्सेस लिमिटेड (वेदांता रिसोर्सेस लिमिटेड) ने झांबियातील तांब्याच्या खाण कंपनीची मालकी परत घेतली आहे. कंपनीने चार वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर हा वाद मिटवला आहे.
वेदांता रिसोर्सेसने एका निवेदनात म्हटले आहे की झांबिया सरकारने आमच्या कंपनीकडे कोनकोला कॉपर माईन्सची(केसीएम)मालकी परत केली आहे. झांबियाचे खाण आणि खनिज विकास मंत्री पॉल काबुस्वे म्हणाले की, केसीएमची मालकी बहुसंख्य भागधारक म्हणून वेदांताला पुन्हा दिली जात आहे.
उद्योजक अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची केसीएममध्ये 79.4 टक्के हिस्सेदारी आहे. केसीएममध्ये तांब्याचा साठा आहे. वेदांताच्या मते, कोनकोला कॉपर माईन्समध्ये 1.6 कोटी टन तांब्याचा साठा आहे.
अनिल अग्रवाल यांनी मानले आभार
वेदांता रिसोर्सेसचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी झांबिया सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत त्यांचे आभारही मानले आहेत. केसीएम ही एक मौल्यवान संपत्ती आहे कारण भविष्यातील प्रमुख तंत्रज्ञानासाठी तांबे हे महत्त्वाचे खनिज आहे.
ते म्हणाले की, वेदांता ही आता तांबे खाणकामापासून उत्पादनापर्यंत संपूर्णपणे एकात्मिक कंपनी बनणार आहे. वेदांताचे केसीएममध्ये परतण्याने भारताला खूप फायदा होईल. तांब्याची मागणी दरवर्षी सुमारे 25 टक्क्यांनी वाढत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.









