ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाराष्ट्रात हजारो रोजगार उपलब्ध करून देणारा वेदांता-फॉक्सकॉन समूहाने आपला मोर्चा गुजरातला वळवला आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यात येत असल्याचा आरोप भाजपवर होत असताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केलेल्या एका दाव्याने ही चर्चा पुन्हा सुरू होणार असल्याचे दिसत आहे. आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंतिम झालेला सेमीकंडक्टरचा (Semiconductor Project) प्रकल्प गुजरातमध्ये गेला असल्याचे म्हटले आहे. वेदांता-फॉक्सकॉन समूहाने (Vedanta Foxconn Semiconductor) गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेमुळे आपल्याला धक्का बसला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
कोरोना साथीच्या सुरुवातीपासून जगभरात सेमीकंडक्टरचा तुटवडा निर्माण झाला आहे. भारतातील ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे. सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे ऑटोमोबाईल कंपन्या ग्राहकांना वेळेवर वाहने पोहोचवू शकत नाहीत. ग्राहकांना वाहनांसाठी प्रदीर्घ वेटिंगमध्ये जावे लागते. फॉक्सकॉन आणि वेदांता समूह देशातील सेमीकंडक्टरची कमतरता दूर करण्यासाठी एकत्र येत आहेत. सोमवारी वेदांता समूहाने फॉक्सकॉन कंपनीसोबत २० अब्ज डॉलरचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करणार असल्याची घोषणा केली. अहमदाबादजवळ हा सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यात येणार आहे.
दरम्यान, वेदांताचा प्रोजेक्ट महाराष्ट्रात स्थापन न करता गुजरातला जाणार असल्याच्या बातमीवर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वेदांताचा प्रोजेक्ट आहे तो गुजरातला गेलेला आहे. वेदांता आणि आणि गुजरातला माझ्या शुभेच्छा आहेत. आपल्या देशात एवढा मोठा प्रोजेक्ट येणं हे चांगलच आहे. तरी देखील या प्रोजेक्टसाठी एक वर्षात अनेक बैठका घेऊन अनेक भेटी देऊन पुण्याच्या जवळ हा प्रोजेक्ट येईल अशी काळजी घेऊन आम्ही काम करत होतो. तेच पुढे नेत असताना मागच्या महिन्यात आम्ही बघितलं की या खोके सरकारने देखील आमच्याच कामावर पुढे केलेलं आणि महाराष्ट्राला आश्वासन केलेलं की हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात येणार आहे. तरीदेखील आज ही बातमी वाचून थोडा धक्का बसला आहे की हा मोठा प्रोजेक्ट गुजरातला गेलेला आहे.
राज्यातील खोके सरकारवर विश्वास नसल्यानेच वेदांता प्रोजेक्ट गुजरातला वळाला असं स्पष्ट होतं. महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यास खोके सरकारला इच्छा नाही, असा हल्लाबोल शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख, माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. पिस्तुल चालवणं, धक्काबुक्की करण्यापेक्षा महाराष्ट्रात गुंतवणूक कशी येईल यावर लक्ष द्या, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला सुनावलं.