वृत्तसंस्था/ मुंबई
डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे नुकत्याच झालेल्या डॅनिश खुल्या जलतरण स्पर्धेत भारताचा जलतरणपटू वेदांत याने रौप्यपदक पटकाविले. 16 वर्षीय वेदांतने रौप्यपदक मिळविल्याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे त्याचे वडील आणि अभिनेता आर. माधवन यांनी म्हटले आहे.
डेन्मार्कमध्ये झालेल्या जलतरण स्पर्धेत पुरूषांच्या 1500 मी. फ्रीस्टाईल प्रकारात वेदांतने 15 मिनिटे, 57.86 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक मिळविले. वेदांतच्या या कामगिरीनंतर त्याचे वडील आणि अभिनेते 51 वर्षीय आर. माधवन यांनी जलतरण प्रशिक्षक प्रदीपकुमार आणि अखिल भारतीय जलतरण फेडरेशनच्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत. 2021 च्या मार्चमध्ये झालेल्या लॅटव्हिया खुल्या जलतरण स्पर्धेत वेदांतने कांस्यपदक मिळविले होते. गेल्यावर्षी झालेल्या कनिष्ठांच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत वेदांतने 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची कमाई केली होती. डेन्मार्कमधील स्पर्धेत भारताच्या साजन प्रकाशने पुरूषांच्या 200 मी. बटरफ्लायमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे.









