वृत्तसंस्था /बर्लिन (जर्मनी)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरु असलेल्या जर्मन खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत क्रोएशियाच्या डोना व्हेकिकने द्वितीय मानांकित इलेना रिबाकिनाला पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तसेच फ्रान्सच्या तृतीय मानांकित कॅरोलिने गार्सियाने ऑस्ट्रेलियाच्या फोरलिसवर मात करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात डोना व्हेकिकने द्वितीय मानांकित रिबकीनाचा 6-7 (1-7), 6-3, 6-4 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. व्हेकिकने विद्यमान विंब्लडन विजेत्या रिबाकीनाची गेल्या 9 सामन्यातील विजयी घौडदौड रोखली. हा सामना 2 तास चालला होता. अन्य एका सामन्यात इलिना अॅव्हेनसेनने अॅना ब्लिंकोव्हावर 1-6, 6-2, 6-3 अशी मात करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. व्हेकिक आणि अॅव्हेनसेन यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. फ्रान्सच्या तृतीय मानांकित गार्सियाने ऑस्ट्रेलियाच्या जेमी फोरलिसचा 6-3, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. चौथ्या मानांकित गार्सियाने पहिल्यांदाच या स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला. 2023 च्या हंगामात गार्सियान 25 सामने जिंकले असून 12 सामने गमाविले आहेत.









