वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी राष्ट्रवादीचे (NCP)अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीमध्ये (MVA)खळबळ उडाली. त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस (Congress) या महाविकास आघडीतील दोन्ही प्रमुख पक्षांनी महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये वंचित बहूजन आघाडीचा समावेश करण्याचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे सांगितले.
शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakcrey) यांनी वंचित बहूजन आघाडीसोबत युती करण्याची घोषणा केल्यानंतर काही दिवसांतच वंचित चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप केला होता. त्यांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ईडी किंवा सीबीआय या तपास यंत्रणांचा गैरवापर करत नसल्याचेही वक्तव्य आंबेडकरांनी या गदारोळादरम्यान केले होते. आंबेडकरांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्ष असलेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर शेवटी भाष्य केले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेससमोर वंचितसोबत युतीचा कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचे सांगितले. ते म्हणाले “माझ्या माहितीनुसार ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांना येत्या निवडणुकीत युती म्हणून एकत्र जायचे आहे. मला इतर कोणत्याही पक्षाची माहिती नाही. आमच्यासमोर असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही.” असे ते म्हणाले.
शरद पवार यांच्या पाठोपाठ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही वंचितच्या महाविकास आघाडीमध्ये घेण्याच्या शक्यतेवर काँग्रेसमध्ये कोणतीही चर्चा नसल्याचे स्पष्ट केले. “शिवसेना आणि व्हीबीए यांच्या युतीशी आमचा काहीही संबंध नाही. आमच्या शुभेच्छा शिवसेनेसोबत आहेत. व्हीबीएशी हातमिळवणी करण्याचा आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव नाही,” असेही ते म्हणाले.