राजस्थान भाजपमधील कथित वादावर अशोक गेहलोतांची टिप्पणी : वसुंधरा राजे यांना डावलले जात असल्याचा दावा
वृत्तसंस्था /जयपूर
राजस्थानात विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्या वसुंधरा राजे यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. माझ्यामुळे वसुंधरा राजे यांना शिक्षा व्हायला नको. राजे यांनी माझे सरकार पाडविण्याच्या प्रयत्नांना समर्थन दिले नव्हते असा दावा गेहलोत यांनी केला. गेहलोत यांनी भाजपकडून वसुंधरा राजे यांना राज्यात डावलले जात असल्याचा संदेश दिला आहे. माझ्यामुळे वसुंधरा राजे यांना शिक्षा झाल्यास हा एकप्रकारे त्यांच्यावर अन्यायच ठरणार आहे. यापूर्वी भैरोसिंह शेखावत यांचे सरकार पाडविण्यासाठी मी भाजप नेत्यांना मदत केली नव्हती. याचनुसार माझ्या सरकारवर संकट आल्यावर वसुंधरा राजे यांनी बंडखोरांना बळ पुरविण्यास नकार दिल्याचा दावा गेहलोत यांनी केला. 90 च्या दशकात मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असताना भैरोसिंह शेखावत हे मुख्यमंत्री होते. शेखावत हे बायपास सर्जरीसाठी अमेरिकेत गेले होते. त्यावेळी त्यांच्याच पक्षाचे नेते सरकार पाडविण्यासाठी प्रयत्नशील होते. हे नेते माझ्याकडे मदतीसाठी पोहोचले होते. तुमचा नेता आजारी असून त्याच्या अनुपस्थितीत तुम्ही जे करताय ते मी योग्य मानत नसल्याचे त्यांना सांगितले होते. यानंतर तत्कालीन राज्यपाल बालीराम भगत यांना या घडलेल्या प्रकाराची कल्पना दिली होती. कैलास मेघवाल यांनाही याची माहिती होती असे गेहलोत यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्रिपदाची खूर्ची
विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्रिपदावरून केलेल्या एका वक्तव्यमुळे काँग्रेसमधील कलह पुन्हा उघड झाला आहे. मुख्यमंत्रिपद सोडण्याची माझी इच्छा आहे, परंतु ही खुर्ची मला सोडत नसल्याचे विधान करत गेहलोत यांनी स्वत:च्या पक्षातील विरोधक म्हणजेच सचिन पायलट यांना एकप्रकारे संदेश दिला आहे. राजस्थानात मुख्यमंत्रिपदावरून गेहलोत आणि पायलट यांच्यात मोठी चढाओढ दिसून आली आहे. दोन्ही नेते अनेकदा परस्परांवर जाहीरपणे निशाणा साधत राहिले आहेत. निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेतृत्वाने दोन्ही नेत्यांना परस्परांमधील वाद संपवून एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचा निर्देश दिला होता. यानंतर नाराज सचिन पायलट यांना काँग्रेस कार्यकारिणी समितीत स्थान देण्यात आले होते.
पायलट यांच्या समर्थकांना उमेदवारी
सचिन पायलट आणि माझ्यात इतके प्रेम आहे की काय सांगू? पायलट यांच्यासोबत माझी भांडणं का होत नाहीत असा प्रश्न आता भाजपला पडला आहे. पायलट यांच्या सहमतीने निर्णय घेतले जात आहेत. आम्ही सर्व जण 40 दिवस हॉटेलमध्ये (राजस्थानातील सत्तानाट्या) राहिलो होतो, आणि त्यानंतर बाहेर पडल्यावर मी सर्वकाही विसरून आता कामाला लागू असे सांगितले होते. पायलट यांच्या समर्थकांना निवडणुकीत उमेदवारी दिली जात आहे. त्यांच्या एकाही शिफारसीवर मी आक्षेप घेतलेला नाही. सोनिया गांधी यांनी मला राजस्थानचे मुख्यमंत्री केले होते. माझ्यावर पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखविला होता, यामागे काही तरी कारण असणारच असे म्हणत गेहलोत यांनी पायलट यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले आहे.









