माउलीच्या अश्व रिंगण सोहळ्याने डोळ्यांचे पारणे फिटले : भाविकांची अमाप गर्दी
वार्ताहर /उचगाव
तुरमुरी येथील श्रीराम मंदिर वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळ्यानिमित्त माउली अश्व रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त जमलेल्या हजारो भाविकांनी मंगळवारी माउली अश्व रिंगण सोहळा हृदयात साठविला. टाळ, मृदंगाचा गजर आणि तुकाराम, तुकारामाच्या नामघोषाने तुरमुरी कॉलनीतील परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला. भक्तिमय वातावरणात परिसराला मंगळवारी पंढरीचे स्वरूप आल्याचे जाणवले. अश्व रिंगण सोहळ्याच्या निमित्त भाविकांनी आणि वारकरी मंडळींनी गर्दी केली होती. मंगळवारी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून हा अश्व रिंगण सोहळा पाहण्यासाठी व माउलीच्या दर्शनासाठी भाविक अफाट गर्दीतून पुढे सरसावताना दिसून येत होते.
शितोळे अंकली सरकार यांच्या माउलीच्या मानाच्या अश्वाने चार गोल रिंगण पूर्ण केले. श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, श्रीमंत सरदार ऊर्जितसिंह राजे शितोळे सरकार, अश्वचालक तुकाराम कोळी आणि अक्षय परीट यांच्या उपस्थितीत हा अश्व रिंगण सोहळा पार पडला. मंगळवारी सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये काला कीर्तन, गंगापूजन, मूर्ती अभिषेक, माउली अश्व रिंगण सोहळा, मंदिर लोकार्पण, महाआरती आणि महाप्रसाद असे आयोजन करण्यात आले होते. हे सर्व कार्यक्रम आणि काला कीर्तन हभप पूर्णानंद काजवे महाराज कोगनोळी यांच्या उपस्थितीत पार पाडले. यावेळी माउली अश्व रिंगण सोहळा, उभे रिंगण आणि गोल रिंगण सोहळा यावेळी पार पडला. याचे औचित्य साधून विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या अनेक मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
लोकार्पण सोहळा
नारायण जाधव यांच्या हस्ते फित कापून नवीन बांधण्यात आलेल्या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी तुरमुरी ग्रा.पं. अध्यक्ष चंद्रकांत जाधव व माजी अध्यक्ष नागनाथ जाधव यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.









