अध्याय सत्तावीसावा
उद्धवाला भगवंतांच्या पूजेचा विधी सविस्तर जाणून घ्यायचा होता तशी त्याने भगवंतांना विनंती केल्यावर पूजाविधिबद्दल सांगताना भगवंत म्हणाले , उद्धवा प्रथम सर्व यथासांग तयारी करावी, मूर्तीत येण्याचे देवांना आवाहन करावे आणि मग पूजेला सुरवात करावी न्यास करून मूर्तीला पवित्र करावे , प्राणायाम करून स्वत:ची चित्तशुद्धी करावी मग देवांना अभ्यंग स्नान घालावे देवाचे अभ्यंग स्नान झाल्यावर पूजेसाठी देवाला सिंहासनावर आणून बसवावे. त्यानंतर आवरणपूजा करावी ती झाल्यावर पार्षदपूजन करावे.
नंतर दुर्गा, विनायक, व्यास आणि विष्वकसेन चार कोप्रयाला चौघे स्थापन करून देवाच्यासमोरच त्यांचेही पूजन करावे. मूळ मूर्तीशी एकरूप असणारे गुरु व परमगुरु यांचे परमेष्ठी गुरुशी ऐक्य धरून पूजन करावे. तसेच इंद्रादिक अष्ट लोकपाळ या सर्वाचे आवाहन करून त्यांचीही आठ दिशांना स्थापना करावी व त्यांचेही त्या वेळी पूजन करावे. ऐपत असेल तर दररोज चंदन, वाळा, कापूर , केशर आणि अगुरू इत्यादी सुगंधित वस्तूंनी सुवासित केलेल्या पाण्याने मला स्नान घालावे आणि त्यावेळी मंत्रांनी अभिषेक करावा. सुवासिक केलेले अत्यंत पवित्र गंगाजळ शंखामध्ये शंखमुद्रा दाखवून भरावे. द्रव्यानुकूलता असल्यास अशा थाटाने रोज महाभिषेक करावा. नाही तर विशेष पर्वाच्या दिवशी किंवा जयंतीउत्सवादिकांचे वेळी असे स्नान घालीत असावे. देवांचे स्नान संपूर्ण झाले म्हणजे मंगलारती करावी आणि मग देवाला वस्त्रs, भूषणे, इत्यादींनी अलंकृत करून त्यांचा शृंगार पूर्ण करावा. देव हा वर्णाने मेघासारखा श्याम म्हणजे सावळा आहे. त्याच्या कमरेला जरीचा पीतांबर नेसवावा, गळ्यात सुवर्णयज्ञोपवीत घालून कंबरेत रत्नजडित कडदोरा घालावा. वाकी आणि तोरड्या ह्यांचा गजर, पायात धुंगरूंचा शणत्कार, मस्तकावर मनोरम मुगुट व कानात कुंडले आणि हृदयावर सुंदर महापदक कपाळावर मुकुटाच्या खाली रत्नजडित मोत्यांची वेल, त्याच्याखाली लावलेला पिवळा गंधाचा टिळा आणि गळ्यात झळकणारा कौस्तुभमणि. भुजांवर बाहुटे व वीरकंकणे बोटात रत्नजडित आंगठ्या आणि पीतांबराची झांक तर अशी की, त्या तेजापुढे सूर्याचे तेजही फिके पडेल. देवाच्या सावळ्या अंगावर शुभ्र चंदनाची शोभणारी उटी, मस्तकावरील केसांच्या झुपक्यावर गुंडाळलेल्या पुष्पांच्या माळा, ज्यावर भ्रमर घरटी करू पाहतात. वैजयंती व वनमाळा पायांपर्यंत लोंबत आहेत व नेत्रांना त्या कशा घवघवीत दिसताहेत. अशा रीतीने तो मेघश्याम देव शोभत आहे याप्रमाणे वस्त्रालंकारभूषणांनी श्रीहरीची पूजा करावी पण पूजेपेक्षाही कोट्यावधि पट अधिक श्रद्धा मनात असावी. भक्त अतिशय श्रीमान् असो किंवा अतिशय दरिद्री असो जेथे शुद्ध आणि परिपूर्ण श्रद्धा असते, तेथेच नारायण संतुष्ट होतो. सर्व पूजेमध्ये श्रद्धा हीच मुख्य प्रमाण आहे. अत्यंत श्रद्धायुक्त असतो तोच देवाचा अत्यंत आवडता होतो. अशा प्रकारे मूर्ति पूर्णपणे श्रृंगारली म्हणजे पाद्य, अर्घ्य व आचमन करावे आणि मधुपर्कविधान देऊन श्रद्धायुक्त पूजा करावी. गंध, अक्षता, चांगली चांगली फुले, दशांग धूप , दीपदान, नीरांजन , इत्यादि साहित्याने साधकांनी पूर्ण श्रद्धेने माझी पूजा करावी. धूप, दीप, नीरांजन वगैरे दाखवून झाले म्हणजे देवास भोजन अर्पण करावे. त्यात नाना प्रकारची पक्वान्ने व षड्रसयुक्त अन्न असावे. मांडे, साखरमांडे , गुळवरी, करंज्या, अमृतफळे, बासुंदी, दुधात बोटवे घालून आटीव दुधाची केलेली खीर, घारगे, कोरवडे, लाडू, तिळांचे लाडू, तसेच अंबवडे वगैरे पदार्थ पुढे वाढावेत. शाकभाज्या दुसऱ्या ओळीला वाढव्यात. मध्यंतरी जिरेसाळी मऊ भात, त्यावर सोलीव मुगांच्या डाळीचे पिवळे धमक वरण व घमघमित सुवासाचे गाईचे लोणकढत तूप, गूळ घालून उत्तम सडून केलेला सांजा, त्यात वेलची मिरी घालून व तुपात परतून मऊ केलेला, तोंडात घालताच अरुवार लागणारा असावा. त्याचप्रमाणे ताकाची उत्तम कढी आंब्याच्या रसाने भरलेली वाटी आणि ताटात केळ्याची वाढलेली शिखरण, जी पाहून इंद्रानेसुद्धा लाळ घोटावी. तसेच दही, दूध, साय, साखर, इत्यादि पदार्थही नैवेद्याला वाढावे परंतु हे लक्षात ठेवावे की, देव काही उपचारांकडे लक्ष देत नाही तर तो श्रद्धेनेच तृप्त होतो. करावयाला सामर्थ्य असेल तर इतके प्रकार रोज करून देवाला नैवेद्य अर्पण करावा. नाही तर विशेष पर्वणीच्या दिवशी अर्पण करावेत.
क्रमश:








