महाकुंभात गेलात तर एकतेचा संकल्प करा : पंतप्रधानांची ‘मन की बात’
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केवळ विशालताच नाही तर विविधता हे महाकुंभाचे वैशिष्ट्या असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी वर्षाच्या शेवटच्या रविवारी ‘मन की बात’मध्ये केले. पुढील वर्षी 13 जानेवारीपासून प्रयागराज येथे आयोजित करण्यात येणाऱ्या महाकुंभला उपस्थित राहणाऱ्या लोकांची विविधता लक्षात घेऊन विविधतेतील एकतेचे असे दुसरे उदाहरण नाही, असे ते म्हणाले. हा मोठा धार्मिक कार्यक्रम दर 12 वर्षांनी आयोजित केला जातो.
29 डिसेंबर रोजी 2024 च्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षातील शेवटची ‘मन की बात’ ऐकवली. याप्रसंगी आगामी महाकुंभ सोहळ्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधानांनी ‘महाकुंभ’चे वर्णन ‘एकतेचा महाकुंभ’ असे केले. तसेच लोकांना आगामी भव्य धार्मिक मेळाव्यातून समाजातील द्वेष आणि फूट दूर करण्याचा संकल्प घेऊन परतण्याचे आवाहन केले. संपूर्ण देश एक झाला पाहिजे हा महाकुंभाचा संदेश आहे. कुंभमध्ये सहभागी होताना समाजातील फूट आणि द्वेषाची भावना दूर करण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी कुंभमेळ्यासोबतच कालाहंडीची भाजी क्रांती, बस्तर ऑलिम्पिक आणि कुरुक्षेत्रातील मलेरिया प्रतिबंधक प्रयत्नांबद्दलही भाष्य केले. यंदाचा हा 9वा आणि शेवटचा भाग होता. लोकसभा निवडणुकीमुळे मार्च, एप्रिल आणि मेमध्ये एपिसोड प्रसारित झाले नव्हते.
संविधान आमच्यासाठी मार्गदर्शक
आगामी प्रजासत्ताक दिन हा संविधानाच्या अंमलबजावणीचा 75 वा वर्धापन दिन असेल, ही देशवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. संविधान काळाच्या कसोटीवर उतरले आहे, असे त्यांनी नमूद केले. राज्यघटना आमच्यासाठी मार्गदर्शक आहे. केवळ संविधानामुळेच आपण आयुष्यात या टप्प्यावर पोहोचलो आहोत, असे मोदी म्हणाले. संविधानातील तरतुदी आणि भावनेशी लोकांना जोडण्यासाठी वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. विरोधी पक्षांनी अनेकदा केंद्र सरकारवर राज्यघटना कमकुवत केल्याचा आरोप केला असला तरी सत्ताधारी पक्षाने ठामपणे इन्कार केला आहे.
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा
जानेवारी महिन्यात 13 तारखेपासून प्रयागराज येथे महाकुंभ होणार आहे. संगम काठावर सध्या जोरदार तयारी सुरू आहे. कुंभ कार्यक्रमात प्रथमच एआय चॅटबॉटचा वापर केला जाणार आहे. याद्वारे कुंभशी संबंधित प्रत्येक प्रकारची माहिती 11 भारतीय भाषांमध्ये मिळू शकते. यासह, कोणीही मजकूर टाइप करून किंवा बोलून कोणत्याही प्रकारची मदत मागू शकतो.









