वार्ताहर / कास :
चार महिन्याच्या प्रतीक्षेनंतर किल्ले वासोटा पर्यटन रविवारपासून (दि. 16) होत असल्याने टेकर्स, पर्यटक आणि व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.
शासनाच्या नियमानुसार दरवर्षी 16 जून ते 15 ऑक्टोबर पावसाळी वातावरण असल्याने किल्ले वासोटा पर्यटन बंद ठेवण्यात येते तसेच 16 ऑक्टोबरला किल्ले वासोटा पर्यटनाला सुरुवात होते, त्याप्रमाणे रविवारपासून किल्ले वासोटा पर्यटनासह स्वयंभू तीर्थक्षेत्र नागेश्वर, चकदेव, पर्वत ही ट्रेकिंगची पर्यटन स्थळे देखील टेकर्स लोकांसाठी पर्यटनासाठी खुली होणार आहेत. मात्र चालू तारखेपासून पर्यटकांना या पर्यटनस्थळी फिरण्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यालयाकडून वाढीव प्रवेश शुल्क आकारणी केली जाणार आहे. याबाबत शासन आदेश यापूर्वीच पारित करण्यात आला आहे.
अधिक वाचा : पुण्यात ‘सेक्सटॉर्शन’चा दुसरा बळी
आदेशात असे म्हटले आहे की, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हद्दीत येणाऱ्या सर्व पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी पर्यटकांना आता वाढीव प्रवेश शुल्क द्यावे लागणार आहे. याबाबत शासनाने पारित केलेल्या आदेशाची माहिती वनक्षेत्रपाल बामणोली बाळकृष्ण हसबनिस यांनी यापूर्वीच दिलेली आहे. येणाऱ्या पर्यटकांच्या माहितीसाठी वाढीव दरपत्र हे पुढीप्रमाणे असणार आहे. यामध्ये जुना दर 12 वर्षांवरील प्रति व्यक्ती 30 रुपये होता, यामध्ये बदल करून हाच दर 100 रुपये प्रति व्यक्ती करण्यात आला आहे. 12 वर्षाच्या आतील व्यक्ती जुना दर 15 रुपये होता तो आता 50 रुपये प्रति व्यक्ती करण्यात आला आहे. गाईड शुल्क जुना दर 200 रुपये प्रति बोट एक गाईड होता, तो 250 रुपये करण्यात आला आहे. बोट /वाहन शुल्क पूर्वी होते तेच 150 रुपये प्रति बोट, प्रति वाहन कायम ठेवण्यात आले आहे. कॅमेरा शुल्क डिएसएलआर लेन्स कॅमेरा जुना दर 50 रुपये होता त्यात बदल करून तो 100 रुपये करण्यात आला आहे. साधा कॅमेरा, पॉईंट शूट कॅमेऱ्यास पूर्वी आकारण्यात येत नव्हते. मात्र आता त्याला देखील शुल्क आकारले जाणार असून ते 50 रुपये घेण्यात येणार आहे. वाढीव शुल्क आकारणी 16 ऑक्टोबरपासून करण्यात येणार आहे.
दरम्यान, वासोटा पर्यटन सुरु होणार असल्याने बामणोली तापोळा शेंबडी-वाघळी मुनावळे या बोट क्लबवरील शेकडो लाँच बोट, स्पीड बोट पर्यंटकांच्या सोईसाठी सज्ज झाल्या असून, शेकडो लाँच व हॉटेल व्यावसायिकांसह नोकर वर्गाच्या उपजीवीकेला गती मिळणार असल्याने स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.









