प्रतिनिधी /वास्को
वास्कोतील दाबोळी भागातून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका करण्यास पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दाबोळीतील महम्मद जाफर काद्री (23) या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. अपहृत मुलगी व संशयीत आरोपीला मुंबईत ताब्यात घेण्यात आले आहे.
वास्को पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 14 वर्षे वयाच्या एका अल्पवयीन मुलीचे 30 मे ला अपहरण झाले होते. यासंबंधी तिच्या पालकांनी वास्को पोलीस स्थानकात तक्रार दिली होती.
पालकांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार वास्को पोलिसांनी संशयिताचा शोध घेण्यास प्रारंभ केला तेव्हा संशयित युवक मुंबईत असल्याचे उघडकीस आले. वास्को पोलिसांचे एक पथक मुंबईला रवाना झाले. पोलिसांनी संशयित आरोपीला मुबइतील पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन त्या मुलीची सुटका केली.
पोलिसांनी दोघांनाही गोव्यात आणून त्या मुलीला पालकांच्या ताब्यात दिले तर महम्मद जाफर काद्री याच्याविरूध्द अपहरणाचा गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे. तो मूळ उत्तर प्रदेशमधील असून त्याचे वास्तव्य दाबोळीत होते.
पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईला रवाना झालेल्या पोलीस उपनिरीक्षक रोहन नागेशकर, हवालदार संतोष भाटकर, शिपाई विश्रांती गावकर यांनी त्याला ताब्यात घेतले.









