केंद्रांबाबत जागृतीचाही अभाव, लोकांमध्ये गोंधळ, सेवेसाठी वणवण
वास्को : आधार कार्ड अपडेटने वास्कोत गंभीर समस्या निर्माण केलेली आहे. संपूर्ण मुरगाव तालुक्याला या समस्येने ग्रासले आहे. वास्को शहरासह मुरगाव तालुक्यात आधार कार्डाच्या कामांबाबत गोंधळ निर्माण झालेला आहे. वास्को शहर व परीसरात आधार कार्डांचे काम करणारी केंद्रे असल्यास त्याबाबत लोकांपर्यंत माहिती पाहोचवावी तसेच या केंद्रांची संख्या वाढवावी अशी मागणी नागरीकांकडून होत आहे. वास्को शहरात पूर्वी बँका व अन्य खासगी आस्थापनांमधून आधार कार्ड बनवणे किंवा दुरूस्त करणे अशी कामे करून दिली जात होती. अधिकृत केंद्रे सरकारच्या परवानगीनेच उघडली होती. सध्या मात्र, अशी सोय वास्को शहर व परीसरात फारच कमी असून लोकांमध्ये ही सोय सध्या कुठे उपलब्ध आहे याबाबत जागृतीही नाही. त्यामुळे लोकांचा गोंधळ उडत आहे. आधार कार्ड बनवण्यासाठी किंवा कार्डांचे नुतनीकरण व दुरूस्तीसाठी लोक वणवण फिरत असतात. इतकडे तिकडे चौकशी करीत असतात. बऱ्याच कष्टाने एखादे ठिकाण सापडल्यास ते कामही त्या ठिकाणी होत नसते. त्यांना दुसरीकडे पाठवले जाते व दुसरीकडून तिसरीकडे पाठवण्याचेही प्रकार घडतात. काहीं लोकांना आपले काम तातडीने करायचे असते. मात्र, बऱ्याच लोकांची कामे पडून असतात. त्यामुळे वेळेवर कामे होत नाहीत. अन्य सोयीबाबत माहिती नसल्याने काही वेळा एकाच ठिकाणी गर्दी पडत असते.
वास्कोत तीन चार बँका तसेच महिला व बाल कल्याण खात्याच्या कार्यालयात आधार कार्डची कामे करून देण्यात येत असतात. परंतु शासकीय खात्याचे कार्यालयच सध्या लोकांना माहित आहे. बरेच लोक या सोयीबाबत अनभिन्न आहेत. महिला व बाल कल्याण खात्याच्या वास्कोतील कार्यालयात आधार कार्डच्या कामांसाठी बरीच गर्दी पडलेली असते. या कार्यालयातील कर्मचाऱ्याला कार्यालयातील इतर कामे आवरीत हे कामही हाताळावे लागते. आठवड्यातून दोन दिवस ठरावीक वेळेत आधार कार्ड अपडेट व संबंधीत कामे या कार्यालयात करून देण्यात येत असतात. विशेष म्हणजे हे शासकीय कार्यालय वास्को शहरा जवळच्या खारवीवाडा भागातील एका जीर्ण इमारतीत असून चिंचोळ्या पायऱ्यांवरून महिला, पुरूष, मुले, वृध्द अशा सर्वांना वरच्या मजल्यावर जावे लागते. लोकांची पायऱ्यांवरच गर्दी पडलेली असते. ही इमारत सोयीस्कर नसली तरी नाईजास्तव लोकांना त्या ठिकाणी जावे लागते. मुरगाव तालुक्यातील दूर दूरच्या ग्रामीण भागातील लोकही आधार कार्डांच्या कामांसाठी वास्को शहरात फिरत असतात. विचारपूस करीत असतात. वारंवार हेलपाटे मारीत असतात. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी आधार कार्ड अपडेटची सेवा देणारी केंद्री वाढवण्याची आवश्यकता असून या केंद्रांबाबत लोकांमध्ये जागृती करणेही आवश्यक आहे. सध्या मुरगाव तालुक्यातील लोकांसाठी ही गंभीर समस्या आहे.









