सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड; शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक
कोल्हापूर प्रतिनिधी
पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या नियामक मंडळ सदस्यपदी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची दुसऱयांदा बिनविरोध निवड झाली. माजी केंद्रीय कृषिमंत्री व इन्स्टिटय़ूटचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवड झाली.
कोल्हापूर जिह्यातील गगनबावडा, पन्हाळा, राधानगरी तालुके व सिंधुदुर्ग जिह्यातील वैभववाडी, कणकवली हे तालुके कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. या कोकण घाटमाथ्यावर दुर्गम व डोंगराळ भागात हा कारखाना असून देखील वेळेत ऊस दर देण्याचा लौकीक कारखान्याने कायम राखला आहे. कारखान्याने आर्थिक व तांत्रिक कार्यक्षमतेत राज्यातील आघाडीच्या कारखान्यात स्थान मिळवले आहे. सन 2010-11 व सन 2019-20 या गाळप हंगामासाठी दुसऱया क्रमांकाचा उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटकडून कारखान्यात मिळाला आहे. गाळप हंगाम सन 2016-17 साठी उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा राज्यस्तरीय कै. ’कर्मयोगी शंकररावजी पाटील पुरस्कार’ कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटकडून प्राप्त झाला आहे.
ऊस वाहतुकीची समस्या असताना देखील अन्य कारखान्यांच्या बरोबरीने ऊस उत्पादकांना कारखान्याने दर दिला आहे. किमान उत्पादन खर्च, किमान दुरुस्ती देखभाल खर्च, किमान वेतन व पगार या आर्थिक मापदंडा मध्येही कारखाना राज्यात आघाडीवर आहे. कारखान्याच्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन कारखान्याचे अध्यक्ष व पालकमंत्री सतेज पाटील यांची निवड झाली आहे.