वृत्तसंस्था/ कैरो (इजिप्त)
आंतरराष्ट्रीय नेमबाजी फेडरेशनच्या येथे रविवारपासून सुरू झालेल्या 2023 च्या विश्वचषक रायफल आणि पिस्तुल नेमबाजी स्पर्धेत नेमबाज वरुण तोमरने पदक तक्त्यात भारताचे खाते उघडताना 10 मीटर एअर रायफल नेमबाजीत कांस्यपदक मिळविले.
पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजीत भारताच्या 19 वषीय वरुण तोमरने आपल्याच देशाचा नेमबाज सरबज्योत सिंग याचा पराभव करत हे पदक हस्तगत केले. आंतरराष्ट्रीय नेमबाजी फेडरेशनच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील तोमरचे हे पहिले पदक आहे. या क्रीडा प्रकारात तिसऱया स्थानासाठी वरुण तोमर आणि सरबज्योत सिंग यांनी मानांकन फेरीअखेर 250.6 असे समान गुण नोंदविले. तसेच स्लोव्हाकियाचा टुझेन स्कायने 254.2 आणि इटलीचा पावलो मोनाने 252.8 गुण नोंदवित अनुक्रमे या फेरीत पहिले आणि दुसरे स्थान मिळविले. टुझेन स्कायने मोनाचा 17-15 असा पराभव करत आघाडीचे स्थान हस्तगत केले.
तत्पूर्वी या क्रीडा प्रकारात पात्रफेरीमध्ये विविध देशांचे 64 नेमबाज सहभागी झाले होते. तोमरने 583 गुण घेत तिसरे स्थान मिळविले. टुझेन स्कायने 585 गुणांसह दुसरे स्थान तर सरबज्योतला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. आता या स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल नेमबाजीत भारताचे टी. धनोतासह अन्य तीन नेमबाज सहभागी झाले. पण त्यांना पहिल्या आठ नेमबाजांमध्ये स्थान मिळविता आले नाही. रमण 570 गुणांसह 45 व्या तर चिमाने 568 गुणांसह 49 वे तसेच धनोताने 565 गुणांसह 52 वे स्थान घेतले.
महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तुल पात्रफेरीमध्ये भारताच्या ईशा सिंगने 577 गुणांसह दुसरे स्थान मिळविले आहे. 2021 साली झालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी फेडरेशनच्या कनि÷ांच्या विश्व नेमबाजी स्पर्धेत ईशा सिंगने रौप्यपदक पटकाविले होते. पण कैरोमधील स्पर्धेत ग्रीसच्या ऍना कोराकेकीने महिलांच्या 25 मीटर पिस्तुल नेमबाजीत पात्र फेरीत 585 गुणांसह आघाडीचे स्थान घेतले असून भारताची मनू भाकर आठव्या तसेच दिव्या सुब्बाराजूने 198.6 गुणांसह तिसरे स्थान मिळविले आहे. ग्रीसच्या ऍना कोराकेकीने 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. भारताच्या यशस्वीनी सिंग देसवालने पात्रफेरीमध्ये 571 गुण नोंदवत 13 वे स्थान मिळविले असून रिदम सांगवानने 568 गुणांसह 23 वे स्थान मिळविले आहे. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तुल नेमबाजीत हंगेरीच्या व्हेरोनिका मेजरने सर्बियाच्या अरुनोव्हिकचा 16-6 असा पराभव करून सुवर्णपदक पटकाविले. सदर स्पर्धा 23 फेब्रुवारीला संपणार आहे.









