पीलीभीतमध्ये उमेदवारी अर्जाचे 4 संच खरेदी
वृत्तसंस्था/ पीलीभीत
भाजपने उत्तरप्रदेशातील 51 मतदारसंघांमधील उमेदवार जाहीर केले आहेत. 23 जागांवरील उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. तर 6 जागा घटक पक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत. पीलीभीतचे खासदार वरुण गांधी यांना भाजप तिकीट देईल की नाही याविषयी साशंकता आहे. याचदरम्यान वरुण गांधी यांच्या सचिवाने पीलीभीतमध्ये येत उमेदवारी अर्जाचे 4 संच खरेदी केले आहेत. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास वरुण गांधी हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवू शकतात.
राज्यातील भाजप नेत्यांनी वरुण गांधी यांना पीलीभीत मतदारसंघाची उमेदवारी देण्यास विरोध दर्शविला असल्याची चर्चा आहे. पीलीभीतमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. याकरता नामांकन प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. पीलीभीत मतदारसंघात भाजप तसेच सपने देखील स्वत:चा उमेदवार जाहीर केलेला नाही. तर मागील काही काळापासून वरुण गांधी हे स्वत:च्याच पक्षाच्या विरोधात भूमिका मांडत होते. यामुळे त्यांना भाजपकडून उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता आहे.









