आयसीसी टी 20 क्रमवारीत अव्वलस्थानी झेप : फलंदाजी, अष्टपैलू क्रमवारीतही भारताचा दबदबा
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू या तिन्ही श्रेणींमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या टी 20 क्रमवारीत वरुण चक्रवर्ती पहिल्यांदाच अव्वल गोलंदाज ठरला. टी-20 रँकिंगमध्ये नंबर वन गोलंदाज बनणारा तो तिसरा भारतीय खेळाडू आहे. याआधी जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई यांनी ही कामगिरी केली आहे. तसेच फलंदाज अभिषेक शर्मा त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर आहे. फलंदाज अभिषेक शर्मा त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्या अव्वल स्थानावर आहे.
वरुण चक्रवर्ती शिवाय रवी बिश्नोई टी-20 क्रमवारीत टॉप 10 मध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय आहे. बिश्नोई आता 8 व्या स्थानावर आहे. याशिवाय, अक्षर पटेल 12 व्या क्रमांकावर आहे. फिरकीपटू कुलदीप यादवनेही चांगली कामगिरी करत 16 स्थानांनी मोठी झेप घेतली असून, तो 604 रेटिंग गुणांसह 23 व्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडचा जेकब डफी दुसऱ्या स्थानावर असून विंडीजचा अकिल होसेन तिसऱ्या स्थानावर आहे.
वरुणने रचला इतिहास
टी-20 मध्ये नंबर 1 रँकिंगवर पोहोचणे ही वरुण चक्रवर्तीसाठी एक महत्त्वाची कामगिरी आहे. आतापर्यंत 20 टी-20 सामने खेळताना त्याने 35 विकेट्स घेतल्या आहेत. वरुण चक्रवर्तीचा इकॉनॉमी रेट फक्त 6.83 आहे आणि त्याने दोन वेळा 5 बळी घेण्याची कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, आशिया कपमध्ये वरुण टीम इंडियासाठी ‘ट्रम्प कार्ड’ ठरला आहे. त्याने दोन सामन्यांमध्ये फक्त दोन विकेट्स घेतल्या असल्या तरी, त्याचा इकॉनॉमी रेट उत्तम राहिला आहे. विशेष म्हणजे तो पॉवरप्लेपासून ते डेथ ओव्हर्सपर्यंत कोणत्याही टप्प्यात गोलंदाजी करू शकतो.
अभिषेक शर्मा फलंदाजीत टॉपला
छोट्या फॉरमॅटमध्ये दमदार कामगिरी करत टी-20 क्रिकेटमध्ये नंबर वनचा ताज मिरवणाऱ्या अभिषेक शर्माने आशिया कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध सामन्यात 200 पेक्षा अधिक स्ट्राइक रेटसह धावा केल्या. या कामगिरीच्या जोरावर त्याने टी-20 कारकिर्दीतील सर्वोच्च रेटिंगसह नवा इतिहास रचला आहे. तो 884 रेटिंगसह अव्वल स्थानावर विराजमान आहे. इंग्लंडचा सलामीवीर फिल साल्ट दुसऱ्या आणि जोस बटलर तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा डेवाल्ड ब्रुईस दोन स्थानांनी पुढे सरकत 11 व्या स्थानी पोहोचला आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हार्दिकचा दबदबा
आयसीसी टी-20 अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत भारताचा हार्दिक पंड्या पहिल्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी दुसऱ्या स्थानी असून झिम्बाब्वेचा सिकंदर रजा तिसऱ्या स्थानी विराजमान आहे.









