जिल्हाधिकाऱ्यांकडून पूर्वतयारी बैठक : शिष्टाचाराचे पालन करण्याची सूचना : कार्यकर्त्यांनीही मांडले विचार : शाळा-कॉलेजमध्ये जयंती सक्तीची
बेळगाव : संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांनी त्या दिशेने तयारी करण्याची सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली. जिल्हा पंचायत सभागृहात सोमवारी झालेल्या पूर्वतयारी बैठकीच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्योतीचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर उद्यानातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात येणार आहे. धर्मवीर संभाजी महाराज चौकपासून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 4 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात मुख्य कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमासाठी आवश्यक पेंडॉल, कटआऊट, आसन व्यवस्था, उद्यानाची स्वच्छता, प्रमुख चौकांमध्ये बॅनर लावणे आदी तयारी महानगरपालिकेने करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
धर्मवीर संभाजी महाराज चौकपासून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, खडेबाजार, शनिवार खूट, काकतीवेस, राणी चन्नम्मा चौकमार्गे ही मिरवणूक डॉ. आंबेडकर उद्यानापर्यंत पोहोचणार आहे. डॉ. बाबासाहेबांबद्दल अभ्यास असणाऱ्यांना व्याख्यानासाठी निमंत्रित करावे, निमंत्रण पत्रिका तयार करताना शिष्टाचाराचे पालन करावे, मिरवणुकीत भाग घेण्यासाठी कन्नड व संस्कृती खात्याने स्थानिक कलापथकांना निमंत्रित करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. यावेळी मल्लेश चौगुले यांनी नियोजित वेळेत मिरवणूक व मुख्य कार्यक्रम व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शाळांना सुटी असते. त्यामुळे त्याआधीच शाळकरी मुलांसाठी चर्चासत्र आयोजित करावे, कार्यक्रमाच्या वेळी रुग्णवाहिका, पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, मिरवणुकीच्या काळात काही ठिकाणी वाहतुकीची समस्या निर्माण होते, त्यामुळे पुरेशा वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी सूचना केली.
ग्रामीण भागातून येणारे चित्ररथ पोलीस अर्ध्यावरच परत पाठवतात. त्यामुळे जिल्हा पोलीसप्रमुखांनी आपल्या अधिकाऱ्यांना सूचना करण्याची मागणी दुर्गेश मेत्री यांनी केली. शाळा-कॉलेजमध्ये 14 एप्रिल रोजी जयंती साजरी करणे सक्तीचे आहे, असेही बैठकीत सांगण्यात आले. यावेळी कऱ्याप्पा गुड्ड्यान्नावर, विवेक करपे आदींनीही आपल्या सूचना मांडल्या. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, एसीपी सदाशिव कट्टीमनी, समाज कल्याण खात्याचे संयुक्त संचालक रामनगौडा कन्नोळी, जिल्हा अनुसूचित जाती-जमाती कल्याण अधिकारी बसवराज कुरीहुली, कृषी खात्याचे संयुक्त संचालक शिवनगौडा पाटील, नगरविकास कोषचे मल्लिकार्जुन कलादगी, पशुसंगोपन खात्याचे डॉ. राजीव कुलेर, भावकाण्णा भंग्यागोळ, महेश शिगीहळ्ळी, लक्ष्मण कोलकार, प्रवीण चलवादी आदी उपस्थित होते.









