प्रतिनिधी /बेळगाव
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती यावषी मोठय़ा उत्साहात गुरुवारी साजरी होणार आहे. सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाचे पूजन करण्यात येणार आहे. यावेळी प्रा. के. डी. मंत्रेशी यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ उपस्थित राहणार आहेत.
यावेळी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., महापालिका आयुक्त रुदेश घाळी, उमा सालीगौडर यांच्यासह नगरसेवक, नगरपंचायत सदस्य, नगरपालिका सदस्य, ग्रा. पं. अध्यक्ष व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
दुपारी 12 वाजता मिरवणुकीचे उद्घाटन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त यावषी भव्य चित्ररथ देखावा मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीचे उद्घाटन गुरुवारी दुपारी 12 वाजता धर्मवीर संभाजी चौक येथे होणार आहे. शहरातून भव्य मिरवणूक काढल्यानंतर दुपारी 4 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पाटबंधारे खात्याचे व पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आमदार अनिल बेनके तर प्रमुख पाहुणे म्हणून अरण्य आणि आहार विभागाचे मंत्री उमेश कत्ती, धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले, विधानसभेचे उपसभापती विश्वनाथ मामणी, आमदार महेश कुमठळ्ळी, दुर्योधन ऐहोळे, पी. राजू यांच्यासह इतर आमदार उपस्थित राहणार आहेत.