छत्रपती शाहू स्टेडियम येथे येत्या 1 ते 4 जानेवारी 2026 दरम्यान रंगणार सोहळा
पुणे / प्रतिनिधी
सातारा येथील छत्रपती शाहू स्टेडियम येथे येत्या 1 ते 4 जानेवारी 2026 मध्ये 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंगणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. ग्रंथदिंडी, कवीकट्टा, परिसंवाद, मुलाखती, बालकुमार आनंदमेळावा असे भरगच्च कार्यक्रम संमेलनात असणार आहेत.
प्रा. जोशी म्हणाले, ग्रंथदिंडी संमेलनाच्या उद्घाटनाच्या आदल्या दिवशी निघणार असून त्याच दिवशी दुपारी ग्रंथ प्रदर्शनाचे तसेच कवीकट्टा आणि बालकुमारांसाठीच्या आनंद मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
वक्त्यांच्या भाषणांपेक्षा चर्चेतून परिसंवादातील विषयांना न्याय दिला जाणार आहे. निमंत्रितांचे कविसंमेलन, समकालीन गाजलेल्या पुस्तकावरील चर्चा, मान्यवर लेखकांच्या मुलाखती, नामवंत कादंबरीकारांशी संवाद असे विविध दर्जेदार कार्यक्रम होणार आहेत. या संमेलनासाठी प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सर्व पूर्वाध्यक्षांना, सरस्वती सन्मानप्राप्त लेखकांना, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त निवडक लेखकांना तसेच साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षांना निमंत्रित केले जाणार आहे.
‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड ही यथार्थ अशीच: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपत‘कार विश्वास पाटील यांचे अभिनंदन केले आहे. ‘साहित्य संमेलन म्हणजे अभिजात मराठीचा मानबिंदू. वैभवशाली मराठीच्या वाटचालीतील समृद्ध दालन. अशा या संमेलनाची शतकपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. या वाटचालीत सातारा येथे नियोजित 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत‘कार विश्वास पाटील यांची निवड ही यथार्थ अशीच आहे. पाटील यांनी आपल्या दमदार लेखणीतून वैविध्यपूर्ण आणि कसदार साहित्यकृतीची निर्मिती केली आहे. यामुळे मराठी साहित्यात मोलाची भर घातली गेली आहे. त्यांच्या निवडीमुळे साहित्य संमेलन अध्यक्षांच्या आतापर्यंतच्या मालिकेचाही दिमाख वाढता असाच राहिला आहे. असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.








