महोत्सव आठवडाभर चालणार : 10 रोजी शोभायात्रा : रक्तदान शिबिराचेही आयोजन
बेळगाव : भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सवानिमित्त बेळगावमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. 10 एप्रिल रोजी शोभायात्रा काढली जाणार आहे. आठवडाभर विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव मध्यवर्ती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष राजेंद्र जैन यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. गुरुवार दि. 3 रोजी भरतेश एज्युकेशन ट्रस्ट व सोमवार दि. 7 रोजी गोमटेश विद्यापीठ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 6 रोजी सकाळी 8 वाजता सीपीएड मैदानापासून बाईक रॅली काढली जाणार असून त्याची सांगता महावीर भवन येथे होणार आहे. शनिवार दि. 5 ते बुधवार दि. 9 या दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये फॅन्सी ड्रेस, नाटक, मान्यवरांचा सन्मान असे कार्यक्रम होणार आहेत.
गुरुवार दि. 10 रोजी महावीर जन्मकल्याण महोत्सवानिमित्त सकाळी 8 वाजता मुख्य शोभायात्रेला सुरुवात होईल. यावर्षी वाढती उष्णता पाहता टिळक चौक येथून शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. यामध्ये महावीरांच्या जीवनावर आधारित चित्ररथ सहभागी होणार आहेत. शेरी गल्ली, शनि मंदिर, कपिलेश्वर ओव्हरब्रिज, एसपीएम रोड, कोरे गल्ली शहापूर, गोवावेस येथून महावीर भवन येथे सांगता होईल. त्यानंतर प्रसादाचे वितरण केले जाणार आहे. ‘जितो’च्यावतीने बुधवार दि. 9 रोजी सकाळी 8 वाजता भारतासह 18 देशांमध्ये ‘नमोकार दिन’ साजरा केला जाणार आहे. बेळगावमध्ये सकाळी 7.30 वाजता महावीर भवन येथे हा उत्सव साजरा होणार असून नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अभय आदीमनी यांनी केले. यावेळी माजी आमदार संजय पाटील, भरतेश संस्थेचे विनोद दोड्डण्णावर, उद्योजक राजू खोडा, सुरेखा गौरगोंडा, अॅड. रविराज पाटील, हिराचंद कलमनी यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.









