आज बाळ्ळी परिसरात प्रभातफेरीचे आयोजन
प्रतिनिधी /कुंकळ्ळी
आपला राष्टध्वज 13, 14 व 15 ऑगस्ट रोजी दिमाखात उभारूया. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याची संधी आम्हाला लाभत आहे. हे आपले भाग्य समजावे. येथे राजकारण आणू नका. पक्षीय मतभेद, अंतर्गत हेवेदावे बाजूला सारून आपण सारे एकत्र येऊया. तसेच तरुणांनी या कार्यक्रमांत मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे माजी आमदार क्लाफासियो डायस यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांची सविस्तर माहिती देण्यासाठी सोमवारी दुपारी कुंकळ्ळीत भाजप कार्यालयात पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. त्यात डायस बोलत होते. मंडळ सचिव शंकर देसाई, खजिनदार विशाल कालेकर, नगरसेवक विशाल देसाई व नगरसेविका पोलिता कारनेरो, रूपा गावकर व संदीप देसाई यावेळी उपस्थित होते. देशभरात तीन दिवस घरांवर ध्वज उभारण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम होत आहे. या निर्णयाचे डायस यांनी स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशाची सुरक्षितता महत्त्वाची असून आपली एकता व अखंडता टिकून राहिली पाहिजे, असे ते म्हणाले.
शंकर देसाई यांनी कार्यक्रमांची रूपरेषा जाहीर केली. 13, 14, 15 रोजी ठरल्याप्रमाणे आपापल्या घरावर राष्ट्रध्वज फडकावयाचा आहे. तत्पूर्वी भाजप मंडळातर्फे पहिला कार्यक्रम आज मंगळवार 9 रोजी सकाळी बाळळी सरकारी हायस्कुलात प्रभातफेरीचा ठेवला आहे. ही फेरी बाळ्ळी येथील मध्यवर्ती चार रस्तापर्यंत निघेल व नंतर हायस्कूलच्या आवारात परतून फेरीचे विसर्जन होईल. 11 रोजी पारोडा, पिंपळपेड येथे युवा मंडळाचा सायकल रॅलीचा कार्यक्रम सायंकाळी 4 वा. ठेवण्यात आला आहे. त्याची सांगता नंतर कुंकळ्ळी कदंब बसस्थानकापाशी होणार आहे. यात युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. त्याचदिवशी कदंब बसस्थानकापासून सायंकाळी 6.30 वा. मशाल मिरवणूक ठेवली आहे. शुभारंभानंतर ही मिरवणूक चिफ्टन स्मारकाला वळसा घालून जुन्या बसस्थानकावरील स्वातंत्र्यसेनानी शाबू देसाई यांच्या स्मारकाच्या ठिकाणी येऊन तेथे विसर्जन होईल कुंकळ्ळी व लगतच्या परिसरांतील तमाम नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.









