हेस्कॉम अधिकाऱ्यांनी समस्या निवारण करण्याची दिली ग्वाही
प्रतिनिधी/ बेळगाव
गृहज्योती योजनेमुळे घरगुती ग्राहकांचे विद्युत बिल कमी येत असल्यामुळे विद्युत बिलातील वाढीच्या समस्या कमी झाल्याचे शनिवारी आयोजित तक्रार निवारण बैठकीत दिसून आले. परंतु, मीटरमधील नावातील बदल करून घेणाऱ्या ग्राहकांची संख्या मात्र वाढली आहे. तक्रार निवारण बैठकीत मीटरवरील नाव बदलून घेण्यासोबतच विद्युत खांब व वाहिन्या ओढणे याबाबतही काही नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या.
हेस्कॉमकडून प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी सर्व उपविभागीय कार्यालयांमध्ये तक्रार निवारण बैठक घेतली जाते. यामध्ये मीटरवरील नावातील बदल, विद्युत बिलातील वाढ, नवीन कनेक्शन यासह इतर तक्रारी जाणून घेतल्या जातात. कणबर्गी येथील एका ग्राहकाने आपल्या घराच्या परिसरात वीजपुरवठा नसल्याची तक्रार मांडली. नवीन वसाहतीमध्ये घर असल्यामुळे अद्याप घरापर्यंत विद्युत खांब व वाहिन्या ओढण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे घराची वास्तुशांती थांबली असून लवकरात लवकर वीजपुरवठा जोडून द्यावा, अशी मागणी केली.
नवीन वसाहत असल्याने यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून वीजपुरवठा जोडून देऊ, असे हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याचबरोबर काही व्यावसायिक ग्राहकांनी विद्युत बिलामध्ये वाढ झाल्याची तक्रार हेस्कॉमकडे केली. त्यांचे झालेले रिडींग व दरपत्रक याची सांगड घालून बिल कशामुळे जास्त आले? याची माहिती ग्राहकांना देण्यात आली.
यावेळी हेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंता ए. एम. शिंदे, विनोद करुर, संजीव हम्मण्णावर, वैशाली कार्वेकर यांच्यासह हेस्कॉमचे इतर अधिकारी उपस्थित होते.









