वार्ताहर/कडोली
कडोली ग्राम पंचायत आणि केदनूर ग्राम पंचायत क्षेत्रातील मंजूर झालेल्या सुमारे 7 कोटी रुपये निधीतून विकास कामांचा शुभारंभ कार्यक्रम पार पडला. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचे चिरंजीव आणि युवा नेता राहुल जारकीहोळी यांच्या उपस्थितीत सदर कामांचा शुभारंभ करण्यात आला. कडोली आणि केदनूर ग्राम पंचायत क्षेत्रात सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी विकास कामांसाठी सुमारे 7 कोटी रुपये मंजूर केले आहेत. कडोली ग्राम पंचायत क्षेत्रात कडोली कलमेश्वर गल्ली, अयोध्यानगर आणि देसाई गल्ली येथे सी. सी. रस्त्यासाठी 60 लाख रुपये मंजूर केले आहेत.
सरकारी स्मशानभूमीसाठी 5 लाख रुपये तसेच कडोली गावच्या शेतशिवारासाठी वरदान ठरलेल्या भरम तलावाच्या सुशोभीकरणासाठी 50 लाख रुपये मंजूर केले आहेत. गुंजेनहट्टी क्रॉस ते हंदिगनूर गावापर्यंतच्या रस्त्यासाठी 5 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. केदनूर ग्राम पंचायत क्षेत्रातील केदनूर गावात सीसी रस्त्यासाठी 35 लाख रुपये मंजूर झाले आहेत. या सर्व कामांचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. युवा नेता राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते कुदळ मारुन विविध विकास कामांचा शुभारंभ झाला. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सागर पाटील, उपाध्यक्ष दीपा मरगाळे, सचिव मलगौडा पाटील, जि.पं. माजी उपाध्यक्ष अरुण कटांबले, केदनूर ग्रा. पं. अध्यक्षा सविता संभाजी, उपाध्यक्षा लक्ष्मी बेळगावी, गावडू बिर्जे व ग्राम पंचायत सदस्य, सदस्या आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









