खानापूर तहसीलदारांना निवेदन
खानापूर : राज्यातील दिव्यांगांना सरकारकडून योग्य सुविधा पुरविण्यात याव्यात, तसेच सध्या असलेल्या दिव्यांगांच्या वेतनात वाढ करून 5 हजार रुपये करण्यात यावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिव्यांग कल्याण संघ खानापूर यांच्यावतीने ग्रेड टू तहसीलदार राकेश बुवा यांना सोमवारी देण्यात आले. निवेदनाचा स्वीकार करून आपण हे निवेदन वरिष्ठांना पाठवू, असे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिव्यांग कल्याण संघ खानापूर या संघटनेच्यावतीने राज्यातील दिव्यांगांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या सुविधांचा थेट लाभ मिळवून देण्यात यावा. सध्या दिव्यांगांना मिळणाऱ्या मासिक मानधनात वाढ करून किमान पाच हजार रु. महिना देण्यात यावे, सर्व दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय शिधापत्रिकाचे वितरण करण्यात यावे, बसपासचा उपयोग संपूर्ण राज्यभर करण्यात यावा, ज्यांना गरज आहे. अशा दिव्यांगांना तातडीने तीनचाकी वाहनांचे वितरण करण्यात यावे, सरकारी नोकरीत पाच टक्के दिव्यांगांना आरक्षण देण्यात यावे तसेच राज्याच्या अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी भरीव तरतूद करण्यात येते. मात्र ती दिव्यांगांपर्यंत येऊन पोहचत नाही, यासाठी तरतूद केलेल्या निधीचे वितरण दिव्यांगांना करण्यात यावे, दिव्यांगांना उद्योग व्यवसायासाठी आर्थिक अनुदान देण्यात यावे, यासह इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अनिल सावंत, श्रीकांत देवगेकर, भावकाण्णा किणयेकर, मारुती गोरल, मष्णू पाटील, वासुदेव पाटील, महादेव पेडणेकर, मारुती गुंडपीकर, निळू पाटील यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.









