राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघाच्या कोकण वर्धापन दिन सोहळ्यात मान्यवरांची ग्वाही
ओटवणे प्रतिनिधी
दिव्यांग बांधवांना जीवन जगताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शासनाने दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना न्याय दिला पाहिजे. दिव्यांग बांधवांसाठी आपण काम केले असून यापुढेही दिव्यांग बांधवांच्या पेन्शन वाढीसह इतर मागण्यांसाठी त्यांच्यासोबत राहणार आहे. असे प्रतिपादन श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी केले. राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघ महाराष्ट्र राज्यातील कोकण शाखेच्या सावंतवाडीत काझी शहाबुद्दीन हॉल येथे झालेल्या तिसऱ्या वर्धापन दिन सोहळ्यात मंगेश तळवणेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महिंद्रा अकॅडमीचे संस्थापक महेंद्र पेडणेकर, गोवा ब्लॉइड वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मिलाग्रीस डिस्कोटा, सचिव कमलाकांत शिरोडकर, छावा संघटनेचे संघटनेचे सदस्य श्याम सावंत, राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघाचे मुंबई अध्यक्ष डी एन मर्डे, कोकण अध्यक्ष बाबुराव गावडे, महासचिव शेखर आळवे सहसचिव प्रकाश वाघ व संस्थेचे इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी गोवा ब्लॉइड वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मिलाग्रीस डिस्कोटा यांनी राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघाच्या कोकण शाखेच्या कार्याचे कौतुक करीत कोकण शाखेतील दिव्यांग बांधवांची लवकरच गोवा येथे सहल आयोजित करणार असल्याचे सांगितले. राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघाचे मुंबई अध्यक्ष डी एन मर्डे यांनी महासंघाचे कोकण विभागीय कार्यालय सावंतवाडीत सुरू करण्याचे आपले प्रयत्न असून या कार्यालयाच्या माध्यमातून कोकणातील दिव्यांग बांधवांच्या समस्या मार्गी लागून त्यांचे जीवन सुखमय होणार असल्याचे सांगितले. महिंद्रा अकॅडमीचे संस्थापक महेंद्र पेडणेकर यांनी आपल्याला केव्हाही हाक मारा आपण दिव्यांग बांधवांच्या नेहमी पाठीशी असल्याचे सांगितले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघाचे कोकण अध्यक्ष बाबुराव गावडे यांनी महासंघाच्या कोकण शाखेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेत दिव्यांग बांधव कोणत्याही योजनेपासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघाचे कोकण शाखेचे महासचिव शेखर आळवे यांनी केले.









