खर्चाची तोंडमिळवणी करताना शाळांची दमछाक
बेळगाव : विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा, यासाठी राज्य सरकारकडून केळी, अंडी किंवा शेंगदाणा चिकी यांचे वाटप केले जात आहे. परंतु, वाढत्या थंडीमुळे अंड्यांच्या वाढलेल्या दरामुळे मिळणारे अनुदान आणि येणारा खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने मुख्याध्यापक व एसडीएमसी कमिटींना स्वत:च्या खिशातील रक्कम खर्ची घालून अंडी खरेदी करावी लागत आहेत. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहारासोबतच सकस आहार मिळावा, यासाठी अंडी व केळी वितरण सुरू करण्यात आले. अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन केळी दिली जातात. आठवड्यातून सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस अंडी व केळी वितरण केले जाते. बेळगाव शहरात समृद्धी या स्वयंसेवी संस्थेकडून या साहित्याचे वितरण केले जाते. ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुख्याध्यापक व एसडीएमसी कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने अंडी व केळी वितरण केले जात आहे. मागील महिनाभरापासून अंड्यांच्या दरात मोठी वाढ होत गेली. सध्या बाजारामध्ये अंड्यांचा होलसेल दर 6 रुपये 20 पैसे झाला आहे. मात्र, सरकारकडून प्रत्येक विद्यार्थ्याला दिले जाणारे अनुदान 5 रुपये 20 पैसे असल्याने वरील खर्च शिक्षक अथवा एसडीएमसी कमिटीला करावा लागत आहे. अंड्यांचा दर व मिळणारे अनुदान याचा ताळमेळ जमत नसल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे.
असे होते अनुदानाचे वितरण
जिल्हा पंचायतीच्या मध्यान्ह आहार विभागाच्यावतीने मुख्याध्यापक व एसडीएमसी कमिटीच्या संयुक्त खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा केली जाते. यामध्ये एका अंड्याला 4 रुपये 40 पैसे, 30 पैसे अंडी उकडण्यासाठीच्या इंधनासाठी, 30 पैसे अंडी सोलणाऱ्या मध्यान्ह आहार मदतीनासाला व 20 पैसे वाहतूक करणाऱ्यांना दिले जातात. यामुळे सरकारकडून एका अंड्यामागे 5 रुपये 20 पैसे अनुदान दिले जाते.









