डॉ. किरण ठाकुर यांच्या हस्ते चित्रप्रदर्शनाचे वरेरकर नाट्या संघ येथे उद्घाटन
बेळगाव : वरेरकर नाट्या संघातर्फे के. बी. कुलकर्णी स्मृतिदिन दि. 4 फेब्रुवारी रोजी आचरण्यात येणार आहे. यानिमित्त ‘के. बी. लिगसी’ या प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी 10 वाजता वरेरकर नाट्या संघ येथे ‘दै. तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी के. बी. कुलकर्णी स्मृती जीवनगौरव पुरस्कार चित्रकार अरुण दाभोळकर यांना व के. बी. कुलकर्णी स्मृती कलागौरव पुरस्कार शिरीष देशपांडे यांना देण्यात येणार आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार सुहास बहुलकर यांचे व्याख्यान होणार आहे. याप्रसंगी आर्किटेक्ट जे. के. नाईक उपस्थित राहणार आहेत.
सुहास बहुलकर यांचा परिचय
सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून जी. डी. आर्ट ही पदविका मिळविल्यानंतर 20 वर्षे प्राध्यापक म्हणून त्याच संस्थेत बहुलकर यांनी सेवा बजावली. आजवर देशात आणि परदेशात त्यांची 19 एकल प्रदर्शने भरली आहेत. 58 सामूहिक प्रदर्शनात त्यांचा सहभाग राहिला आहे. अनेक अखिल भारतीय प्रदर्शनांमधून त्यांना सुवर्णपदक, रौप्यपदक व सर्वोच्च सन्मान मिळाले आहेत. राष्ट्रपती भवन, संसद भवन, सर्वोच्च न्यायालय, रिझर्व्ह बँक, टाटा ग्रुप, एशियाटिक सोसायटी अशा अनेक प्रतिष्ठित शासकीय व खासगी संस्थांसाठी त्यांनी काम केले आहे.
नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी महाराष्ट्र शासन, माझगाव डॉक, डिपार्टमेंट ऑफ अॅटॉमिक एनर्जी अशा विविध आस्थापनांसाठी त्यांनी आकर्षक चित्रनिर्मिती केली आहे. 1971 व 73 च्या चित्ररथांसाठी सुवर्ण चषक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. जहाँगीर आर्ट गॅलरीच्या निधी संकलनासाठी त्यांनी परिश्रम घेतले आहेत. विस्मरणात गेलेल्या दिवंगत व एकेकाळी गाजलेल्या चित्रकारांच्या चित्राकृतींचे आयोजन व अभिरक्षण करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. आजवर त्यांना जीवनगौरव पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदा पुरस्कार तसेच टिळक विद्यापीठाकडून डी.लिट. पदवी देऊन गौरविण्यात आले आहे.









