प्रतिनिधी /बेळगाव
वरेरकर नाटय़ संघातर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त रविवारी आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला स्पर्धकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हेरवाडकर स्कूल येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये 1 हजारहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. एकूण 4 गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.
पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी व खुला गट अशा चार गटात स्पर्धा पार पडली. चारही गटांना विविध विषय देण्यात आले होते. स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. स्पर्धकांसोबत त्यांचे पालक हेरवाडकर स्कूल परिसरात जमले होते.
स्पर्धेचे परीक्षण लवकरच करून विजेत्या स्पर्धकांना निकाल कळविला जाणार आहे. त्याचबरोबर वृत्तपत्रातून सविस्तर निकाल दिला जाणार आहे. त्यानंतर बक्षीसपात्र चित्रांचे प्रदर्शन भरविले जाणार आहे. वरेरकर नाटय़ संघाच्या के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीमध्ये 26 ते 28 ऑगस्टदरम्यान प्रदर्शन भरविले जाणार आहे. चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 26 रोजी प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर वरेरकर नाटय़ संघाच्या सभागृहात होईल. विजेत्या स्पर्धकांना वैयक्तिकरीत्या कळविले जाणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.









