उद्या राखी पौर्णिमा; खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी
बेळगाव : श्रावणातील तिसरा शुक्रवार दि. 8 रोजी असून या दिवशी अनेक घरांतून वरद महालक्ष्मी पूजन होणार आहे. लक्ष्मीला प्रिय असणारी फुले, फळे यांची आरास करून पुलाचाराप्रमाणे ही पूजा करण्याची प्रथा आहे. वास्तविक श्रावणातील पैर्णिमेपूर्वी येणाऱ्या शुक्रवारी वरद महालक्ष्मी पूजन करण्यात येते. श्रावण पौर्णिमा शनिवार दि. 9 रोजी आहे. काहींनी श्रावणातील दुसऱ्या शुक्रवारी (दि. 1) वरद महालक्ष्मी पूजन केले. वरद महालक्ष्मी पूजन समृद्धीची देवी लक्ष्मीच्या आराधनेसाठी केले जाणारे महत्त्वाचे व्रत आहे. श्रावण मासातच हे व्रत केले जाते. महालक्ष्मी देवीची षेड़शोपचारे पूजा ज्यामध्ये आवाहन, गंध, धूप, दीप, अक्षता, नैवेद्य, आरती अशा एकूण 16 उपचारांचा समावेश असतो. वरद महालक्ष्मी पूजन करून वाण देणे, हळदी-कुंकू असे कार्यक्रमही हेत असतात.
कर्नाटकात विशेषत: हुबळी, धारवाड, बेंगळूर परिसरात या पूजचे प्रस्थ अधिक दिसून येते. देवीला सुंदर साडी नेसविली जाते. अलंकार, दाग़िने, कमरपट्टा, हार, नथ यांचा श्रृंगार केला जातो. या पूजेपूर्वी गणेशाची पूजा केली जाते. गणेश व लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला वर म्हणजे आशीर्वाद मिळतो, अशी भावना आहे. वरद महालक्ष्मी पूजन हे वरदान देणाऱ्या लक्ष्मीचे रूप आहे. शुक्रवार दि. 8 रोजी दुपारी 2.12 नंतर पौर्णिमा येत असून शनिवार दि. 9 रोजी दुपारी 1.24 पर्यंत पौर्णिमेचा कार्यकाळ आहे. भाऊ-बहीण यांच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन शनिवारी आहे. शुक्रवारचे वरद महालक्ष्मी पूजन व शनिवारी साजरा होणारा रक्षाबंधनाचा सण साजरा करण्याच्या निमित्ताने फुले, फळे, कर्दळी, केळीची झाडे, केवडा, राख्या आदी वस्तू खरेदीसाठी गुऊवारी सायंकाळी बाजारपेठेत गर्दी दिसून आली.









