वृत्तसंस्था/ बटुमी
जॉर्जियातील बटुमी येथे झालेल्या फिडे महिला विश्वचषकाच्या दुसऱ्या फेरीच्या टायब्रेकरमध्ये भारतीय महिला ग्रँडमास्टर वंतिका अग्रवालने जोरदार झुंज देऊन युक्रेनची माजी विश्वविजेती अॅना उशेनिनाचा बचाव भेदत विजय नोंदविला. तथापि, पद्मिनी राऊतला स्वित्झर्लंडची आणखी एक माजी विश्वविजेती अलेक्झांड्रा कोस्टेनियुककडून पराभव पत्करावा लागला आणि स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
टायब्रेकरच्या अनेक फेऱ्यांनंतरही गुण 3-3 असे बरोबरीत राहिल्यानंतर शेवटी वंतिका हिने दबावाखाली खचून न जाता 4.5-3.5 असा विजय मिळवला. दोन्ही खेळाडूंनी क्लासिकल गेममध्ये प्रत्येकी एक विजय नेंदविला, ज्यामुळे रॅपिड टायब्रेकरची मालिका सुरू झाली. वंतिकाने रॅपिड प्रकारात काळ्या सेंगाट्यांनिशी खेळताना पहिला प्रहार केला, परंतु उशेनिनाने पुन्हा विजय मिळवून 2-2 अशी स्थिती केली. बरोबरीची स्थिती कायम राहिल्याने नंतर तीन सेकंदांच्या अतिरिक्त वेळेसह प्रति खेळाडू पाच मिनिटांच्या लढतींचे सत्र सुरू झाले. या उच्च दबावाच्या टप्प्यातच वंतिका उशेनिनाच्या एका महत्त्वपूर्ण चुकीचा फायदा घेत पुढे सरकली आणि अखेर तिसऱ्या फेरीत पोहोचली.
भारतीय खेळाडूची तिसऱ्या फेरीत आव्हानात्मक लढत कॅटेरिना लॅग्नोशी होणार आहे, जी आता रशियाकडून खेळते. दुसरीकडे, पद्मिनीला कोस्टेनियुकविऊद्धच्या जलद टायब्रेकरमध्ये नशिबाची साथ मिळाली नाही. तिथे भारतीय खेळाडूने पहिला गेम जिंकून आघाडी घेतली. कोस्टेनियुकला बरोबरी करण्यासाठी विजयाची आवश्यकता होती आणि पद्मिनीने तिच्या संधी गमावल्यानंतर तिने हे साध्य केले.
चौथ्या संचात पद्मिनीने पांढऱ्या सोंगाट्यांनिशी खेळताना पहिला गेम गमावला आणि दुसरा गेमही गमावत असताना कोस्टेनियुकने बरोबरीवर समाधान मानण्याचे ठरविले. कारण तिला पुढील फेरीत घेऊन जाण्यासाठी ते पुरेसे होते. वंतिकाच्या कष्टाने मिळवलेल्या विजयामुळे शेवटच्या 32 खेळाडूंच्या टप्प्यात अजूनही पाच भारतीय खेळाडू शिल्लक आहेत. त्यातील कोनेरू हम्पी तिसऱ्या फेरीत पोलंडच्या क्लाउडिया कुलोनविऊद्ध खेळेल, तर डी. हरिका ग्रीसच्या स्टॅव्ह्रोला त्सोलाकिडोऊचा सामना करेल. आर. वैशालीला अमेरिकेच्या कॅरिसा यिपविरुद्ध आणि दिव्या देशमुखला सर्बियाच्या तिओदोरा इंजॅकविऊद्ध खेळावे लागेल.









