वार्ताहर /नंदगड
खानापूर-तालगुप्पा राज्य मार्गावरील कसबा नंदगड गावाजवळचा व्हन्नव्वादेवी तलाव पावसाच्या पाण्याने तुडुंब भरला आहे. त्यामुळे वर्षभर जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. कसबा नंदगड गावाजवळ रस्त्यालगत हा तलाव आहे. गर्बेनहट्टी, नंदगड शेतवडीतील व जंगल परिसरातील पाणी या तलावात येते. त्यामुळे हा तलाव पावसाळ्यात सर्वात लवकर भरतो. यावर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तुडुंब भरला आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून अतिरिक्त पाणी कालव्याद्वारे बाहेर जात आहे. कसबा नंदगड, गर्बेनहट्टी व नंदगड गावातील जनावरांना पिण्याची पाण्याची सोय झाली आहे. तर कपडे धुण्यासाठी या पाण्याचा उपयोग केला जातो.
या तलावाच्या खालच्या बाजूला कसबा नंदगड, भुतेवाडी या गावांच्या हद्दीतील शेतीवाडी येते. तलावातील साचलेल्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो. त्यामुळे हा तलाव त्या भागातला महत्त्वाचा तलाव आहे. संबंधित खात्याने तलावाच्या बांधाची व त्यालगत असलेल्या रस्त्याची दुरुस्ती केल्याने तलावात मुबलक प्रमाणात पाणी साचले तरी तलावाला कोणताही धोका होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. आता तलाव पावसाच्या पाण्याने तुडुंब भरल्याने हे पाणी पाहण्यासाठी सायंकाळच्या वेळी लोकांची गर्दी होत आहे.









