संत कनकदास जयंतीही साजरी : संगीत अन् कीर्तनात स्थानिक भाषेच्या वापरामुळे महत्त्व
वार्ताहर/हलशी
द. म. शिक्षण मंडळ संचलित कन्या विद्यालय नंदगड येथे 2025 मध्ये वंदे मातरम्ला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शनिवार दि. 8 रोजी कार्यक्रम झाला. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेले आपले राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ हे 1875 मध्ये 7 नोव्हेंबर रोजी अक्षय नवमीच्या शुभ मुहूर्तावर लिहिले होते. वंदे मातरम् हे त्यांच्या आनंदमठ या कादंबरीचा भाग म्हणून बंगदर्शन या साहित्यिक जर्नलमध्ये प्रथम प्रकाशित झाले. वंदे मातरम् या गीताची 150 वी वर्षपूर्ती विद्यार्थिनींच्या उपस्थितीत सदर गीत गाऊन साजरी करण्यात आली. तसेच संत कनकदास जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एम. कदम होते. कार्यक्रमाची सुरुवात थोर संत कनकदास यांच्या फोटोंचे पूजन करून करण्यात आली. संत कनकदास यांच्या जीवन चरित्राबद्दल समाज विज्ञान विषयाचे शिक्षक सी. आय. पाटील यांनी सविस्तर माहिती सांगताना म्हणाले.
कनकदास हे कर्नाटकातील (भारत) एक आदरणीय संत, कवी, तत्त्वज्ञ आणि भगवान कृष्ण (विष्णू) यांच्या महान भक्तापैकी एक होते. त्यांनी माध्वाचार्यांच्या द्वैत वेदांत तत्त्वज्ञानाचे पालन केले आणि ते प्रसिद्ध विद्वान आणि संत व्यासतीर्थ यांचे शिष्य बनले. संत आणि संगीतकार कनकदासाची जयंती आदराने साजरी केली जाते. या महान कवीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कर्नाटकात हा दिवस प्रादेशिक सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित करण्यात आला आहे. कर्नाटक संगीत आणि कीर्तनात स्थानिक भाषेच्या वापरामुळे त्यांना महत्त्व प्राप्त झाले. कनकदास यांच्या जयंतीनिमित्त, त्यांच्या कार्याचा आणि त्यांना एक प्रभावशाली व्यक्ती म्हणून साजरा करण्यासाठी अनेक लोक जमतात. हा दिवस साजरा करण्यासाठी महाविद्यालये, शाळा आणि विद्यापीठांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला एस. एम. कदम, सी. आय. पाटील, एस. व्ही. बेनचेकर, एन. ए. देसाई, के. जी. पुंभार, महादेव हलशीकर, के. जी. आंबेवाडकर, अक्षता चलकी, शीला पाटील व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.









