राष्ट्रसेविका समितीतर्फे सामूहिक वंदे मातरम गायन
बेळगाव : बंगाली आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये आपल्या लेखनाने बंकिमचंद्रांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. 1874 मध्ये लिहिलेले त्यांचे वंदे मातरम् हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे ठरले आहे. स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय असलेल्या साहित्यिकांनी वंदे मातरम्सारख्या महान आणि अजरामर रचनांनी स्वातंत्र्यलढ्याला नवसंजीवनी मिळाली आहे, असे उद्गार राष्ट्रसेविका समिती अखिल भारतीय सहकार्यवाह अलकाताई इनामदार यांनी काढले. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रसेविका समिती बेळगावतर्फे बी. के. मॉडेल हायस्कूलच्या मैदानावर सामूहिक वंदे मातरम् गीताचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शरदचंद्रराव मुंडरगी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषेत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. अलकाताई इनामदार पुढे म्हणाल्या, वंदे मातरम् हे गीत स्वातंत्र्यलढ्याबरोबर देशाचे गीत बनले. बंकिमचंद्र चॅटर्जी म्हणायचे, वंदे मातरम् हे गीत मी रचले नसून भारतमातेने ते माझ्याकडून करवून घेतले आहे. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत सादर केले. त्यानंतर प्रत्येक अधिवेशनात हे गीत गायिले जाते, असेही त्या म्हणाल्या. यावेळी उपस्थितांनी सामूहिक वंदे मातरम गीताचे गायन केले. यावेळी महिला, विद्यार्थी उपस्थित होते.









