मडगाव : ‘वंदे भारत एक्सप्रेस’ नेमकी कधीपासून सुरू होणार ? अशी गेले काही दिवस चर्चा सुरू आहे. 29 किंवा 30 मे रोजी दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावणार अशी शक्यता वर्तविली जात होती. पण, ही शक्यता फोल ठरल्यानंतर आत्ता वंदे भारत जून महिन्यात धावणार हे जवळपास नक्की झालेले आहे. कोकण रेल्वे मार्गावरील ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या उद्घाटनासाठी अखेर ‘काउंट डाऊन’ सुरू झाले आहे. शुभारंभासाठी नवीकोरी सेमी हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेस गाडी मडगावमध्ये दाखल झाली आहे. या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिरवा बावटा दाखवणे अपेक्षित असल्याने यासाठी सर्व तयारी मडगाव कोकण रेल्वे स्थानकात केली जात आहे. संपूर्णपणे भारतीय बनावटीची असलेली सेमी हाय स्पीड वंदे भारत एक्स्प्रेस टेन कोकण रेल्वेच्या मार्गावर गेल्या आठवड्यात मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगाव दरम्यान ही गाडी चालविण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून ‘ट्रायल रन’ यशस्वीपणे घेण्यात आली. मे महिना संपल्याने आत्ता जून मध्ये ती धावणार हे जवळपास नक्की झाले आहे.
चेन्नईतील इंटिग्रेटेड कोच पॅक्टरीमधून मडगाव-मुंबई मार्गावर चालवण्यासाठी आठ डब्यांची नवी कोरी गाडी गोव्यात मडगाव यार्डात उभी आहे. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर मडगाव जंक्शनमध्ये रंगरंगोटी तसेच इतर अनेक कामे हातात घेण्यात आलेली आहे. ही कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. आता या गाडीला नेमका हिरवा झेंडा कधी दाखवला जातो, गाडीचे वेळापत्रक तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार या बाबतची उत्सुकता प्रवाशांमध्ये आहे. रेल्वेकडून या गाडीच्या उद्घाटनाच्या तारखेची अधिकृत घोषणा कधी होते, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या वंदे भारत मुळे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल असा विश्वास पर्यटन क्षेत्राशी निगडीत व्यक्तीकडून व्यक्त केला जात आहे. गोव्याबरोबरच शेजारील सिंधुदुर्ग जिह्यातील मालवण- तारकर्ली, वेंगुर्ले तसेच रत्नागिरी जिह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होतील अशी आशा येथील व्यापारी वर्ग व्यक्त करत आहेत.









