प्रवास सुखकर होणार असल्याची जगदीश शेट्टर यांची माहिती : आज होणार जल्लोषी स्वागत
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव-बेंगळूर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे रविवार दि. 10 रोजी उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी बेंगळूरमध्ये उद्घाटन करणार आहेत. बेळगाव रेल्वेस्थानकावर रात्री 8 वाजता वंदे भारतचे स्वागत केले जाणार आहे. वंदे भारतमुळे बेळगावकरांचा प्रवास सुखकर होणार असल्याची माहिती खासदार जगदीश शेट्टर यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
बेळगावमधून वर्षभरापूर्वी पुण्याला ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू करण्यात आली. त्यानंतर बेंगळूर शहरासाठी वंदे भारतची मागणी जोर धरू लागली. डिसेंबर 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन वंदे भारतची मागणी करण्यात आली. यावेळी बेंगळूर-धारवाड वंदे भारतचा विस्तार करण्याचा प्रस्ताव होता. परंतु मे 2025 मध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतंत्र रेल्वे देण्याची घोषणा केली.
एका दिवसात मिळाली परवानगी
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यात आली. त्यावेळी त्यांना वंदे भारत एक्स्प्रेसची आठवण करून देण्यात आली. त्यांनी तात्काळ रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केली आणि अवघ्या एका दिवसात बेंगळूरमधून वंदे भारत सुरू होईल, अशी बातमी आली. त्यामुळे याचे सर्व श्रेय पंतप्रधानांनाच जाते, असे शेट्टर यांनी स्पष्ट केले. बेळगाव-सांबरा रस्त्याचे चौपदरीकरण, तसेच राज्य महामार्गांना राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा देण्याची मागणी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले.
राहुल गांधी यांनी बेंगळूर येथे मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप केला होता. परंतु राहुल गांधी हे अपरिपक्व नेते आहेत. देशाला सक्षम विरोधी पक्षनेता गरजेचा होता. परंतु काँग्रेस सध्या हताश झाले असल्याने विनाकारण आरोप करीत आहेत. तसेच धर्मस्थळाची होणारी बदनामी थांबवून अप्प्रचार बंद करावा, असेही त्यांनी सांगितले.









