घटप्रभा, गोकाक, चिकोडीच्या प्रवाशांना लाभ
बेळगाव : पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसला अखेर बेळगाव जिल्ह्यात दुसरा थांबा मिळाला आहे. गुरुवार दि. 2 पासून घटप्रभा रेल्वेस्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेसला थांबा दिला जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील इतर नागरिकांनाही वंदे भारतने पुणे व हुबळीपर्यंतचा वेगवान प्रवास करता येणार आहे. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेत वंदे भारतला घटप्रभा येथे थांबा देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत जिल्ह्यातला दुसरा थांबा घटप्रभा येथे देण्यात आला. यामुळे घटप्रभा, गोकाक, चिकोडी परिसरातील नागरिकांना ये-जा करणे सोयीचे होणार आहे. या नवीन सेवेचा शुभारंभ गुरुवार दि. 2 रोजी सायंकाळी 7 वाजता घटप्रभा रेल्वेस्थानकावर होणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार जगदीश शेट्टर, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्यासह नैर्त्रुत्य रेल्वेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.









