सव्वा चार तासात 280 किलो मिटरचा प्रवास
मिरज प्रतिनिधी
बहुचर्चित वंदे भारत एक्सप्रेस अखेर गुरूवारी मिरजकरांच्या अंगणात पोहोचली. दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाकडून हुबळी ते मिरज या 280 किलोमीटर मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसची प्रथम ट्रायल चाचणी घेण्यात आली. या मार्गावर ताशी 60 किलोमीटर वेगाने वंदे भारत एक्सप्रेसने आठ रिकाम्या बोगींसह आपला पहिला प्रवास पूर्ण केला. आता सोमवारी 16 रोजी अधिकृत उद्घाटनानंतर पुणे-मिरज-हुबळी व्हाया कोल्हापूर अशी वंदे भारत एक्सप्रेसची सेवा सुरू होणार आहे. दरम्यान, ट्रायल चाचणीवेळी रेल्वे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी वंदे भारत एक्सप्रेसचे जोरदार स्वागत केले.
वेगवान आणि आरामदायी प्रवासासाठी देशभरात चर्चेत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसची पश्चिम महाराष्ट्राला प्रतीक्षा होती. देशातील इतर स्थानकांप्रमाणे आपल्या भागात ही रेल्वे कधी येणार? वंदे भारतचा प्रवास कसा असेल, वंदे भारत कशी धावत असेल, काय सुख-सुविधा असतील, याचे कुतुहल प्रवाशांना लागून राहिले होते. दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या हुबळीपासून मिरजपर्यंत आणि मिरजपासून पुण्यापर्यंत सुमारे 550 किलोमीटर विद्युतीकरण आणि दुहेरीकरणाचे काम पूर्णत्वास आल्याने या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हुबळी विभागाने सर्वप्रथम हुबळी-मिरज ते पुणेपर्यंत वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. त्याला मंजूरी मिळून वंदे भारतचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. गुरूवारी हुबळी ते मिरज या 280 किलोमीटर मार्गावर वंदे भारतची प्रथमच ट्रायल चाचणी घेण्यात आली. आठ रिकाम्या बोगींसह ही रेल्वे हुबळी स्थानकावऊन सुटून केवळ चार तासात 280 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत ती मिरज जंक्शनवर आली व तिथूनच परतीच्या प्रवासासाठी हुबळीकडे रवाना झाली. आता ट्रायल चाचणी पूर्ण झाल्यानंतर दोन दिवसात वंदे भारतचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होईल. त्यानंतर सोमवारी 16 रोजी उद्घाटनानंतर सदर रेल्वे सेवा सुरू होईल, असे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले.
वंदे भारतची सेवा सुरू झाल्यानंतर ही गाडी हुबळी-मिरज व्हाया कोल्हापूर आणि कोल्हापूर-मिरज ते पुणे असा प्रवास करणार आहे. हुबळीवऊन आल्यानंतर एक वेळीच ही गाडी कोल्हापूरला जाईल. मात्र, पुण्याहून परतीचा प्रवास करताना ही गाडी कोल्हापूरला न जाता मिरजेतूनच हुबळीकडे प्रस्थान करणार आहे. कोल्हापूरला वंदेभारतची एकेरी सेवा देण्यात आल्याने प्रवाशी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोल्हापूर व सांगलीतील आमदार, खासदारांकडून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. वंदे भारत व्हाया कोल्हापूर सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने मंजूरी दिली आहे. मात्र, पुणे विभागाकडून सदर रेल्वे कोल्हापूरकडे सोडण्यासाठी नकार देण्यात आला आहे.
हुबळी ते पुणे अडीच तासांची बचत
वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर हुबळी ते पुणे रेल्वे प्रवासाची वेळ कमी होणार आहे. अन्य एक्सप्रेसमधून प्रवासासाठी हुबळी ते पुणे किमान दहा ते 12 तासांचा कालावधी लागतो. मात्र, वंदे भारत एक्सप्रेस केवळ आठ तासात हुबळीहून थेट पुण्यात पोहचणार आहे. वेगवान आणि आरामदायी प्रवासाची सामान्य प्रवाशांनाही संधी मिळणार आहे.
रेल्वेच्या तीन फेऱ्या हव्या
वंदे भारत एक्सप्रेसचा कोल्हापूरातील प्रवाशांना लाभ झाल्यास सदर गाडीला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. त्यामुळे हुबळी-मिरज व्हाया कोल्हापूर असा एकेरी प्रवास न करता पुण्याहून हुबळीकडे जाणारी वंदे भारतही कोल्हापूरकडे वळविणे गरजेचे आहे. सदर रेल्वे आठवड्यातून तीन-तीन दिवस सोडल्यास येता-जाता मिरज व कोल्हापूर स्थानकावर गाडीची देखभाल दुरूस्ती करण्याची सोय उपलब्ध होईल. त्यामुळे येता-जाता महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देऊन वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापूरपर्यंत सोडावी, अशी मागणी रेल्वे सल्लागार समिती सदस्य सुकुमार पाटील यांनी केली आहे.