भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी सध्या पुन्हा चर्चेत आहेत. अक्षयकुमारच्या येऊ घातलेल्या ‘रामसेतू’ या चित्रपटावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. या चित्रपटात रामसेतूचे प्रतिमा हनन करण्यात आले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. शनिवारी त्यांनी एका ट्विटद्वारे त्यांची व्यथा मांडली. तसेच या चित्रपटाचे निर्माते व अभिनेते अक्षयकुमार यांच्यावर खटला दाखल करण्याचा इशारा दिला.
अक्षयकुमार यांची कर्मा नामक मीडिया कंपनी आहे. या कंपनीद्वारे या चित्रपटाची निर्मिती सुरू आहे. चित्रपटात अक्षयकुमार एका पुरातत्व संशोधकाच्या (ऑर्कियोलॉजिस्ट) भूमिकेत दाखविलेला आहे. प्रभू रामचंद्रांनी लंकेला जाण्यासाठी बांधलेल्या सेतूसंबंधीचा आशय या चित्रपटात आहे. या चित्रपटाचे एक पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले असून त्यानंतर अक्षयकुमारला सोशल मीडियावर बरेच ट्रोल करण्यात आले आहे. अक्षयकुमार या चित्रपटात रामसेतूची सत्यता तपासण्याच्या कामावर असल्याचे दाखविण्यात आले आहे. हा चित्रपट 24 ऑक्टोबरला प्रसारित होणार आहे. तथापि, आधीपासूनच बरीच वादग्रस्तता निर्माण झाल्यामुळे त्याची प्रसिद्धीही झाली आहे. चाणक्मय मालिकेचे निर्माते डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोडय़ुसर आहेत. सुब्रमण्यम स्वामी यांनी इशारा दिल्याप्रमाणे अक्षयकुमारवर कायदेशीर कारवाई केल्यानंतरच आक्षेपाची कारणे समजून येतील.









