लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने (MVA) प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला (VBA) 4 जागांचा प्रस्ताव दिला असल्याचा खुलासा महाविकास आघाडीचे नेते आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
वंचित बहूजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामिल होण्यासाठी जागावाटपांच्या अडथळ्यांतून जात असून या दोन्ही मधला तिढा अजूनही सुटला नाही. महाविकास आघाडीमध्ये सामिल होण्याच्या तयारीत असलेल्या प्रकाश आंबेडकर मात्र सातत्याने काँग्रेसवर टिका करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि वंचित बहूजन आघाडीमध्ये काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. महाविकास आघाडीमधील (MVA) घटकपक्ष शिवसेना (UBT), NCP (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस यांच्यामध्ये जागावाटपावर कोणत्याही प्रकारचा समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप करून प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
दरम्यान आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “वंचित बहूजन आघाडीने आम्हाला दिलेल्या 27 जागांच्या यादीपैकी आम्ही त्यांना चार जागांसाठी प्रस्ताव पाठवला आहे. आम्ही प्रकाश आंबेडकरांना 4 जागांच्या ऑफरवर विचार करण्यास सांगितलं असून त्यांच्या अजूनही काही मागण्या असतील तर त्यांनी कळवावे. VBA साठी आमचे दरवाजे शेवटपर्यंत खुली आहेत.” असे त्यांनी म्हटले आहे.