बाजारपेठेत पाण्याचा अपव्यय : गणपत गल्ली कॉर्नरजवळ गळती, नागरिक संतप्त
बेळगाव : वाढत्या उष्म्याबरोबरच शहरात पाणीसमस्या गंभीर बनू लागली आहे. तर दुसरीकडे जलवाहिन्यांच्या गळतीमुळे पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिक संतप्त होऊ लागले आहेत. जलवाहिन्यांच्या दुरुस्तीबाबत एलअॅण्डटी आणि मनपा उदासीन असल्याचे दिसत आहे. त्यामुळे दररोज शहरात कुठे ना कुठे लाखो लिटर पाणी वाया जाऊ लागले आहे. एकीकडे मनपा पाणी जपून वापरा, असा संदेश देत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. खडेबाजार आणि गणपत गल्ली कॉर्नरवर व्हॉल्व्हला गळती लागून दिवसभर शेकडो लिटर पाणी वाया जात होते. एलअॅण्डटी कंपनीचे कर्मचारी तात्पुरती मलमपट्टी करून दुरुस्ती करीत आहेत. मात्र दोन-चार दिवस गेले की, पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ याप्रमाणे पुन्हा जलवाहिनीला नादुरुस्ती होऊ लागली आहे. त्यामुळे पुन्हा पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. शहरात पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. शहरात सात-आठ दिवसाआड पाण्याचा पुरवठा केला जात आहे. काही ठिकाणी नागरिकांना पाण्याचा टँकर विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. अशी गंभीर परिस्थिती असली तरी काही ठिकाणी मात्र पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल आणि राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीतदेखील झपाट्याने घट होऊ लागली आहे. काही दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा राकसकोप जलाशयात शिल्लक आहे. त्यामुळे एलअॅण्डटी कंपनीची चिंता वाढली आहे. मात्र दुसरीकडे शहरात काही ना काही कारणास्तव पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. जलवाहिन्या व व्हॉल्व्हच्या दुरुस्ती तातडीने करून पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी होऊ लागली आहे. गणपत गल्ली कॉर्नरवर व्हॉल्व्हला गळती लागून पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे वाहतुकीलादेखील अडथळा निर्माण होऊन पादचाऱ्यांनादेखील ये-जा करणे कठीण होत होते. सातत्याने शहरात जलवाहिन्यांच्या गळतीचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे पाच टक्के पाणी असेच वाया जाऊ लागले आहे. दरम्यान, म्हणावा तसा वळीव झाला नसल्याने विहिरी, कूपनलिकांच्या पाणी पातळीतदेखील घट होऊ लागली आहे. त्यामुळे शहरातील काही विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणीसमस्या गंभीर बनू लागली आहे. अशा परिस्थितीत विनाकारण वाया जाणारे पाणी तातडीने थांबविणे गरजेचे आहे.
समादेवी गल्ली-गोंधळी गल्ली येथे जलवाहिनीला गळती
समादेवी गल्ली, बेळगाव येथील रायका स्वीटमार्ट समोरील रस्त्यावर पाण्याच्या पाईपला आणि गोंधळी गल्ली कॉर्नर येथील पाण्याच्या व्हॉल्व्हला गेल्या अनेक वर्षांपासून गळती लागली आहे. मध्यंतरी पाणीपुरवठा मंडळाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, ती दुरुस्ती व्यवस्थितरित्या करण्यात न आल्याने नेहमी पाणी रस्त्यावरून वाहत असून अनेक गॅलन पिण्याचे पाणी वाया जात आहे. यासंबंधी परिसरातील नागरिकांकडून वारंवार तक्रार करूनदेखील पाणीपुरवठा मंडळ याकडे कानाडोळा करीत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.









