उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वत्थनारायण : केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन ऍण्ड रिसर्च सेंटरचा दीक्षांत सोहळा
प्रतिनिधी /बेळगाव
सत्य, नीतिमान आचरण, शांती, प्रेम व अहिंसा या पाच मुद्दय़ांवर वैश्विक शिक्षणाची उभारणी झाली आहे. 21 व्या शतकात ज्ञान, कौशल्य व मूल्याधिष्ठित शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली आहे. केवळ शहरी भागात नाही तर दुर्गम भागातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचविण्याचे आव्हान तरुण डॉक्टरांसमोर असणार आहे. बैठी जीवनशैली, आहाराच्या सवयी यामुळे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, पक्षाघात यासारख्या आजारांचे प्रमाण वाढत असून यातून रुग्णांना बाहेर काढण्यासाठी तरुण डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असे प्रतिपादन उच्च शिक्षणमंत्री डॉ. सी. एन. अश्वत्थनारायण यांनी केले आहे.
केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन ऍण्ड रिसर्च सेंटर (काहेर) चा 12 वा वार्षिक दीक्षांत सोहळा बुधवारी पार पडला. या कार्यक्रमात डॉ. अश्वत्थनारायण बोलत होते. व्यासपीठावर काहेरचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, कुलगुरु डॉ. विवेक सावजी व विभागप्रमुख उपस्थित होते.
डॉ. अश्वथनारायण म्हणाले, आज प्रत्येक माहिती एका बटणाच्या क्लिकवर उपलब्ध आहे. आपण जे शिक्षण घेतो ते केवळ पैसे कमविण्यासाठी अथवा उपजीविका करण्यासाठी नसावे. समाज आणि राष्ट्रनिर्माणासाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग व्हावा, हा उदात्त हेतू विद्यार्थ्यांनी ठेवणे आवश्यक आहे. देशात तरुणांची संख्या जास्त असल्याने या तरुणाईचा वापर देश महासत्ता होण्यासाठी करून घेतला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
काहेरचे कुलगुरु डॉ. विवेक सावजी यांनी केएलई परिवाराविषयी माहिती देत संस्थेचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान स्पष्ट केले. केएलईने हुबळी येथे 150 विद्यार्थ्यांची क्षमता असणारे एमबीबीएस कॉलेज सुरू केले आहे. त्याचबरोबर बेळगाव येथील जे. एन. मेडिकल कॉलेजमध्ये चार स्पेशालिटी कोर्सेस सुरू केले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर केएलईच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविल्याचे त्यांनी सांगितले.
दीक्षांत सोहळय़ावर पाडली छाप
दीक्षांत समारंभात एकूण 1500 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. 37 सुवर्ण, 14 पीएचडी, 10 पोस्ट डॉक्टरल, 494 पोस्ट गॅज्युएट, 909 पदवीधारक, 11 पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, 34 सर्टिफिकेट कोर्स, 8 फेलोशीप व 22 डिप्लोमाधारकांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. सर्वाधिक सुवर्णपदके मिळविणाऱया डॉ. राजश्री प्रधान यांनी दीक्षांत सोहळय़ावर छाप पाडली.









