सहानुभूती, हवामान जागरुकता, लिंग समानता, भावनिक बुद्धिमता यासह दहा मूल्यांचा समावेश
बेळगाव : राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आता ‘मूल्याधारित शिक्षण’ सुरू होणार असून यामध्ये दहा मूलभूत विषयांचा समावेश करण्यात येणार आहे. यात सहानुभूती व करुणा, हवामान जागरुकता, अपंगत्व समावेश, डिजिटल सुरक्षा, सायबरबुलिंग प्रतिबंध, लिंगसमाज, लिंग समानता, भावनिक बुद्धिमता, सामाजिक जबाबदारी आणि प्रामाणिकपणा या मूल्यांचा सामावेश असेल. डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या बेळगाव अधिवेशनात शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांनी ‘नीतीशास्त्र वर्ग’ सुरू करण्याची घोषणा केली होती. 2025-26 शैक्षणिक वर्षापासून वर्ग सुरू करण्याचे नियोजन असून या संदर्भातील मूल्यशिक्षण पुस्तक जवळपास तयार झाले आहे. याबाबतची माहिती त्यांनी नुकतीच दिली आहे.
पहिली ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या या पुस्तकात 10 मूलभूत मूल्ये असतील. ही मूल्ये गोष्टी, उपविषय व विविध कृतींच्या माध्यमातून शिकविली जाणार आहेत. मुख्य मूल्ये सर्व वयोगटांसाठी समान असली तरी प्रत्येक इयत्तेनुसार त्यांची मांडणी वेगळी राहील.उदाहरणार्थ, लहान वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना शरीर सुरक्षा, वैयक्तिक अवकाश आणि मर्यादा याबद्दल शिकविले जाईल. इयत्ता 3 ते 5 वी मधील विद्यार्थ्यांसाठी रस्ता आणि माहिती सुरक्षा शिकविली जाईल, तर उच्च माध्यमिक वर्गात डिजिटल सुरक्षा, आर्थिक साक्षरता आणि सायबरबुलिंग प्रतिबंध यांचा समावेश असेल. लिंग समानता, लिंगसमाज, लिंगाधारित हिंसा आणि लिंग तटस्थता या विषयांवरही भर दिला जाणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशील विचार, नवकल्पना आणि प्रयोगशिलता वाढविण्यावर विशेष भर असेल.
भावनांच्या व्यवस्थापनापनाबाबत अध्यापन
भावनिक बुद्धिमत्ता हा एक महत्त्वाचा नवीन विषय असणार आहे. लहान मुलांना स्वत:च्या भावना आणि इतर भावनांची जाणीव करून दिली जाईल. तर मोठ्या विद्यार्थ्यांना राग, दु:ख आणि भीती यासारख्या भावनांचे व्यवस्थापन कसे करावे हे शिकविले जाईल. सामाजिक जबाबदारी अंतर्गत घरात स्वयंसेवा, सार्वजनिक संपत्तीची काळजी घेणे आणि मतदानविषयी जागरुकता निर्माण करण्यास प्राधान्य दिले जाईल. या अभ्यासक्रमामध्ये सहानुभूती, करूणा, आदर, प्रामाणिकपणा, प्रामाणिक वर्तन, चुका मान्य करण्याची हिंमत अणि दोषारोप न करता वागणे या मूल्यांचाही समावेश असेल. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय लावण्यासही प्रोत्साहन दिले जाणार आहे. शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने हा कार्यक्रम लवकरच राज्यभर सुरू करण्याचे नियोजन केले आहे. राज्यात सुमारे 49 हजार शाळा असून त्यामध्ये 49 लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.









