कराड :
सैदापूर (ता. कराड) येथील गजानन हाऊसिंग सोसायटी येथील लिगाडे-पाटील कॉलेजशेजारी असलेल्या वर्धन गार्डन हाईटस् इमारतीतील दोन बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी सुमारे दोन तोळे सान्याचे दागिने व ५० हजार रुपये रोख रक्कम असा दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. शनिवारी सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत सुधीर जयसिंग मोरे यांनी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर मोरे हे वर्धन गार्डन हाईटस् इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहतात. शनिवारी ते बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी कपाट उचकटून कपाटातील १६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ५० हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
दरम्यान, याच इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या रत्नराज रामचंद्र सोनावले यांचाही बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडला. सोनावले यांच्याही दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. बेडरूममध्ये लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये असलेले सुमारे दीड तोळे सोन्याचे दागिने व चांदीचे ब्रासलेट असा सुमारे ७७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला.
एकाच दिवशी एकाच इमारतीतील दोन बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडल्याने येथील रहिवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी करीत आहेत.








