वाळपई शहरांमध्ये जल्लोषी वातावरण
वाळपई : वाळपई पोलीस प्रशिक्षण केंद्र व वाळपई पोलीसस्थानक यांच्या नऊ दिवशीय गणेश बाप्पांना थाटात निरोप देण्यात आला. यावेळी वाळपई शहरांमध्ये जल्लोषी वातावरण निर्माण झाले होते. सार्वजनिक गाऱ्याणे झाल्यानंतर वाळपई पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या गणपतीची मिरवणूक केंद्राकडून सुरू झाली. त्यानंतर वाळपई पोलीस स्थानकाच्या गणेश बाप्पा बरोबरच दोघांची मिरवणूक शहरांमध्ये आली. वाळपई शहराला वळसा घातल्यानंतर वाळपई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दिंडी भजन या प्रकारचे पारंपारिक कार्यक्रम आयोजित केले होते. यामध्ये वाळपई पोलीस स्थानकाचा कर्मचारी वर्ग व पोलीस प्रशिक्षण केंद्राचा कर्मचारी वर्ग व प्रशिक्षणार्थीने यामध्ये भाग घेतला होता. पूर्णपणे जल्लोषी वातावरण निर्माण झाले होते. वाळपई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ही मिरवणूक पोहोचताच पावसाचेही जोरदार आगमन झाले. रात्री उशिरा मासोर्डे येथील गणेश विसर्जन स्थळी गणेश बाप्पाला निरोप देण्यात आला. वाळपई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दारूकामांची आतषबाजी केली. सदर विसर्जन सोहळा पाहण्यासाठी सत्तरी तालुक्मयाचे वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात गणेश भक्त व नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी पोलीस प्रशिक्षण केंद्र व पोलीस स्थानकातर्फे गणेश बाप्पाला तोफांची सलामी देण्यात आली. गेल्या नऊ दिवसापासून गणेश बाप्पाची थाटात पूजा केली. वाळपई पोलीस स्थानावर वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले होते. आजच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला, असे पोलीस निरीक्षक दिनेश गडेकर यांनी सांगितले.









