लॅण्डलाईन फोन सुविधा विस्मृतीत जाण्याची शक्यता : सरकारी कार्यालयातील दूरध्वनी संच बंद
वाळपई : भारत संचार निगमनच्या वाळपईच्या केंद्राची व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. सदर ठिकाणी कर्मचाऱ्यांची वानवा व इमारतीची दुरावस्था यामुळे दूरध्वनी यंत्रणा व्यवस्थापन पूर्णपणे ठप्प झालेली आहे. वाळपई शहरातील अनेक कार्यालयातील लॅण्डलाईन दूरध्वनी संच बंद पडले असून त्याची दुऊस्ती करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे सध्या तरी नागरिक व ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. एकेकाळी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये खणखणणारा लॅण्डलाईन दूरध्वनी आता अभावानेच दिसू लागलेला आहे. सत्तरी तालुक्यात मात्र पूर्णपणे ही यंत्रणा बंद पडल्याचे चित्र पहावयाचे मिळत आहे. सध्या अनेक ठिकाणी मोबाईलचे टॉवर उभे राहू लागलेले आहेत. यामुळे लॅण्डलाईनकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत असून यातच भारत संचार निगमने याचे व्यवस्थापन करण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकांनी लॅण्डलाईन दूरध्वनी संच बंद करण्यावरच भर दिलेली आहे.
अनेक कार्यालयामधील लॅण्डलाईन बंद
वाळपई शहरामध्ये सत्तरी तालुक्यातील अनेक सरकारी कार्यालय आहेत. या कार्यालयामध्ये दूरध्वनी संच व्यवस्था करण्यात आली होती. एकेकाळी प्रत्येक कार्यालयातील लॅण्डलाईन दुरध्वनी संच हे संपर्काचे महत्त्वाचे साधन होते. मात्र आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. वाळपई शहरांमध्ये कार्यरत असलेले भारत संचार निगमचे केंद्र आता ओसाड पडले आहे. या ठिकाणी कर्मचाऱ्यांची वानवा आहे. इमारतीची पूर्णपणे दुर्दशा झालेली आहे. यामुळे ही इमारत कधी कोसळेल याची शाश्वती देता येत नाही. अशा अवस्थेत सध्यातरी वाळपई सरकारी कार्यालयातील दूरध्वनी संच ठप्प झालेली आहेत.
महत्त्वाचे म्हणजे अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे वाळपई येथील फायर ब्रिगेड दूरध्वनी संच गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडलेला आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या तक्रारी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी केलेले आहेत. यापूर्वी वाळपई कार्यालयातून दुऊस्तीची कामे हाती घेण्यात येत होती. आता कामगार यंत्रणा या ठिकाणी हलविण्यात आलेली आहे. यामुळे अनेक वेळा तक्रारी करूनही तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचा तक्रारी कर्मचाऱ्यांनी केलेले आहेत. त्याचप्रमाणे वाळपई शहरातील अनेक सरकारी कार्यालयामध्ये असलेले दूरध्वनी संच सध्यातरी बंद पडल्याच्या परिस्थितीत पहावयास मिळत आहेत. सत्तरी तालुक्यामध्ये एकूण बारा ग्रामपंचायती आहेत. या प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये दूरध्वनी संच उपलब्ध करण्यात आले होते. एकेकाळी पंचायत कार्यालयातील दूरध्वनी संच म्हणजे गावातील नागरिकांची चांगल्या प्रकारची सुविधा निर्माण झाली होती. आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. कारण प्रत्येक पंचायत कार्यालयामध्ये असलेले दूरध्वनी संच सध्या तरी पूर्णपणे बंद पडलेले आहेत.
तरीही ग्राहकांचा थंडा प्रतिसाद
अनेक गावांमध्ये जे लॅण्डलाईन दूरध्वनी संच होते ते पूर्णपणे बंद पडलेले आहेत. ज्या ठिकाणी मोबाईलचा नेटवर्क मिळत नाही त्या ठिकाणी नवीन यंत्रणेचा फोन उपलब्ध करण्यात आलेला आहे. मात्र सदर फोन सुद्धा अनेक वेळा ना दुऊस्त बनतो. सदर फोन दुऊस्त करण्यासाठी विलंब होतो. यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला आहे. एका बाजूने खासगी कंपन्यांचा वाढता प्रभाव, चांगल्या सुविधा, चांगल्या प्रकारचे नेटवर्क तर दुसऱ्या बाजूने भारत संचार निगमचे ढासळलला कारभार यामुळे येणाऱ्या काळात भारत संचार निगमचे सर्व लॅण्डलाईन फोन शोभेच्या वस्तू बनण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही.









