अपघाताच्या घटनांत वाढ : सार्वजनिक बांधकाम खात्याकडे प्रस्ताव रखडला
प्रतिनिधी / वाळपई
वाळपई ते भुईपाल दरम्यान रस्ता खड्डेमय बनलेला आहे. यामुळे वाहन चालकांना अनेक स्तरावर डोकेदुखी सहन करावी लागत आहे. गणेश चतुर्थीच्या काळात गणेश भक्तांना खड्डय़ातून वाट काढताना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करावे, अशी मागणी वाहन चालकांस नागरिकांनी केली आहे.
वाळपई ते भुईपाल दरम्यानचा रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. खड्डे चुकविताना वारंवार अपघात होताना दिसत आहेत. यासाठी रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणाचा प्रस्ताव त्वरित मंजूर करावा, अशी मागणी जोर धरू लागलेली आहे.
वाळपई शहर ते भुईपाल या दरम्यानचा जवळपास आठ किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे खड्डेमय बनला आहे. खास करून रेडीघाट येथे रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आहे. या रस्त्यावरून मोठय़ा प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. यामुळे खड्डे चुकविताना समोरून येणाऱया वाहनामुळे अपघात घडण्याची शक्मयता आहे.
वाळपई शहरासह सत्तरीतील ग्रामीण भाग तसेच होंडा, पणजी, म्हापसा, डिचोली या भागात जाण्यासाठी या मार्गाचा वापर केला जातो. यामुळे या रस्त्यावर वाहनांची नेहमे वर्दळ असते.
दोन टप्प्यांत सरकारकडे प्रस्ताव सादर!
वाळपई ते होंडा दरम्यानच्या हॉटमिक्स डांबरीकरांचा प्रस्ताव दोन टप्प्यामध्ये सरकारला सादर केला होता. भुईपाल ते होंडा दरम्यानच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर पावसाळय़ापूर्वी या रस्त्याचे हॉटमिक्स करून करण्यात आले. मात्र वाळपई ते भुईपाल दरम्यानच्या रस्त्यांच्या प्रस्तावाला अजून पर्यंत मान्यता मिळालेली नाही. यामुळे सदर रस्त्याचे काम हाती घेतलेले नाही, अशी माहिती साबांखा अधिकाऱयांनी दिली.









