यमनापूर येथील संघटनेचे निवेदन
बेळगाव : यमनापूर गावातील वाल्मिकी समाजाला गावाशेजारी असणाऱ्या हिंडाल्को कंपनीच्या जागेमध्ये कायमस्वरुपी स्मशानभूमी करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन वीर मदकरी नायक युवक संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यमनापूर ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात असणारी जमीन हिंडाल्को कंपनीला देण्यात आली आहे. यापूर्वी हिंडाल्को कंपनीच्या व्याप्तीमध्येच वाल्मिकी समाजासाठी स्मशानभूमी उपलब्ध होती. मात्र कंपनीसाठी जमीन गेल्यानंतर काकतीजवळील कंपनीच्या जागेमध्ये स्मशानभूमी निर्माण करून देण्यात आली होती. ही स्मशानभूमी आता ग्रामस्थांसाठी अडचणीची ठरत आहे. 2013-14 मध्ये कंपनीच्या काकती येथील जागेमध्ये स्मशानभूमी निर्माण करून देण्यात आली होती. ही स्मशानभूमी यमनापूर गावापासून 3 कि. मी. अंतरावर आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर वाहतूक वाढल्यामुळे अडचण निर्माण होत आहे. यासाठी गावाजवळ असणाऱ्या हिंडाल्को कंपनीच्या जागेमध्ये स्मशानभूमी निर्माण करून देण्यात यावी. हिंडाल्को कंपनीकडूनही जागा देण्यास संमती दर्शविली आहे. येथील सर्व्हे क्र. 154 मध्ये असणाऱ्या काकती येथील स्मशानभूमीतील नाव कमी करून नवीन जागेमध्ये स्मशानभूमीसाठी उतारा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यमनापूर गावातील इतर समाजातील नागरिकांसाठी स्मशानभूमी उपलब्ध आहेत. त्या प्रमाणेच वाल्मिकी समाजालाही जुन्या जागेमध्ये स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.









